नागपूर : शिवसेनेच्या 12 पैकी एका मंत्र्यांनेही काम केलं नाही, असं म्हणत वरोरा-भद्रावती मतदारसंघाचे आमदार बाळू धानोरकर यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला. नागपूरमध्ये काल (23 ऑगस्ट) आयोजित पूर्व विभागीय मेळाव्यात बाळू धानोरकर बोलत होते.
शिवसेनेच्या मंत्र्यांकडून वाईट वागणूक
"पूर्व विदर्भाच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या मंत्र्यांकडून वाईट वागणूक दिली जाते. एकाही कार्यकर्त्यांचं समाधान झालं नाही, मंत्री कुठलंच काम करत नाही, एक मेळावाही घेत नाहीत. या मंत्र्यांच्या काळात शिवसेना खाली गेली. भद्रावती नगरपरिषद निवडणुकीत एकही मंत्री प्रचाराला आला नाही, वेळ देतात पण प्रचाराला येत नाही, ही शिवसैनिकांची फसवणूक आहे," असा आरोपही धानोरकर यांनी केला आहे.
...तर राजीनामा देईन
शिवसेनेच्या मंत्र्यांवर टीका करताना बाळू धानोरकर म्हणाले की, "मंत्र्यांचं त्यांचं जिल्हात सोडाच पण त्यांच्या मतदारक्षेत्रातही काम नाही. शिवसेनेच्या 12 पैकी एका मंत्र्यांचं जरी काम असेल तर मी आमदारकीचा राजीनामा देईन. शिवसेनेच्या मंत्र्यांचा महाराष्ट्राला काही फायदा आहे का याचा विचार करा."
आताच सत्तेतून बाहेर पडा
"याशिवाय शिवसेनेचे मंत्री भाजप मंत्र्यांसोबत संधान बांधून आहेत. शिवसेना आता सत्तेतून बाहेर पडली तरंच आपण 288 आमदारकीच्या आणि 48 खासदारकीच्या जागा लढवू शकू आणि भगवा फडकवू शकू, असा सल्लाही त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे. आता जर आपल्या हातून चुका झाल्या तर परत लढण्याच्या लायकीचे राहणार नाही असं सांगतल युती झाली तर निवडणूक लढणार नाही," असा निर्धारही यावेळी त्यांनी केला आहे.
शून्य नियोजनामुळे अधोगती
"शिवसेनेच्या मंत्र्यांच्या मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युती करुन लढल्या जातात, हा केविलवाणा प्रकार आहे. मंत्री केलेल्या कामाचं साधं पत्र आमदाराला देत नाहीत मात्र दुसरीकडे भाजप पदाधिकाऱ्यांना मंत्र्यांचे निधी दिल्याचे पत्र जातात. आपलं नियोजन शून्य आहे म्हणून आपण अधोगतीला जातोय," असा आरोप बाळू धानोरकर यांनी केला आहे.