औरंगाबाद: मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यात लोकांना सगळ्यात जास्त हौस असते ती सेल्फीची. तुम्ही फिरायला जा, एखाद्या कार्यक्रमात जा किंवा मग काम नसताना घरी बसलेले असा. ही सेल्फीची हौस आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. पण कधी आणि कुठे सेल्फी घ्यावी याचं भान प्रत्येकाला असायला हवं.

औरंगाबाद महापालिकेच्या उपमहापौरांनी चक्क दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या अस्थिकलशासोबत सेल्फी घेण्याचा आचरटपणा केलाय.

ही दृश्यं व्हायरल झाल्यानंतर उपमहापौर विजय औताडे यांच्यावर चहूबाजूंनी टीका होतेय. सेल्फी कुठे घ्यायचा आणि कुठे नाही, याचं तारतम्य सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या लोकांनी ठेवायला हवं, अशाही प्रतिक्रिया औरंगाबादकरांनी दिल्या आहेत. विशेष म्हणजे वाजपेयींच्या शोकप्रस्तावाला विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांना मारहाण करण्यात औताडे यांचा सहभाग होता.

एमआयएम नगरसेवकाला मारहाण

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध करणारे एमआयएमच्या नगरसेवकाला भाजप नगरसेवकांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार , 17 ऑगस्टला औरंगाबाद महापालिकेत घडला. भाजप नगरसेवकांनी एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना चोप दिला.

भाजप संघटना मंत्र्यांच्या गाडीची तोडफोड

शिवसेनचे राजू वैद्य यांनी 'भारतरत्न' अटलजींचा श्रद्धांजली प्रस्ताव मांडला. मात्र सय्यद मतीन यांनी या प्रस्तावाला विरोध केला. यानंतर संतापलेले नगरसेवक प्रमोद राठोड, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे, उपमहापौर विजय औताडे हे मतीन यांच्यावर धावून गेले. यापुढे जाऊन त्यांनी मतीन यांना बेदम मारहाण करुन सभागृहाबाहेर बाहेर काढलं. तसंच सय्यद मतीनला कायमस्वरुपी निलंबित करावं, अशी मागणीही या नगरसेवकांनी केली आहे. सय्यद मतीन यांना मारहाणीनंतर संतप्त झालेल्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयासमोरील भाजप संघटना मंत्र्यांच्या गाडीची तोडफोड केली. तोडफोड केल्याप्रकरणी नगरसेवकासह एमआयएमच्या 100 कार्यकर्त्यांविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संबंधित बातम्या

औरंगाबाद | MIM नगरसेवक मतीनला मारहाण करणाऱ्या भाजपच्या 5 नगरसेवकांना अटक  

वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्ताव विरोध प्रकरण, एमआयएम नगरसेवक अटकेत  

नगरसेवकाला मारहाणीनंतर एमआयएमच्या कार्यकर्त्यांचा राडा