मुंबई : एसटी महामंडळाच्या वतीने आज विविध योजना आणि दोन नवीन एसटी बसेसचं लोकार्पण करण्यात आलं. 2019 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नवनवीन योजनांचा धडाका सुरु झाला आहे.


एक अनोखी योजना म्हणजे आता आदिवासी महिला एसटी चालक होणार आहे. येत्या दिवाळीपासून आदिवासी महिला एसटी चालक दिसणार आहेत. तर एसटीचं रुपडं पालटणाऱ्या दोन नवीन बसही आता एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.



एसटी महामंडळाच्या वतीने 'राष्ट्रीय कृतज्ञता दिन' सोहळ्यात विविध योजनांचं लोकार्पण करण्यात आलं. एसटीच्या नवीन डिझाईनच्या परिवर्तन बसचं म्हणजे लालपरीचं आणि एसटीच्या पहिल्या किफायतशीर (शयनयान) स्लीपर कोच बसचं उद्घाटन करण्यात आलं.



यवतमाळच्या आदिवासी महिलांची एसटी चालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत महिला एसटी चालवताना दिसतील. तर गडचिरोली जिल्ह्यातील आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी युवकांची एसटी महामंडळाच्या विविध पदांवर नियुक्ती करण्यासाठीही योजना जाहीर करण्यात आली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेची घोषणा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेचीही घोषणा करण्यात आली. या योजनेंतर्गत शहिदांच्या वारसांना नोकरी आणि पत्नीला मोफत आजीवन प्रवास पास देण्यात येईल. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही घोषणा केली.

पुण्याच्या स्वारगेट एसटी स्थानकाच्या ठिकाणी अत्याधुनिक मल्टीमॉडेल बस पोर्ट तयार करणार येतील. या ठिकाणी मेट्रो, बस आणि इतर वाहतूक सेवा एकत्रित करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

एसटी डेपोत लोक तासन् तास थांबतात, त्यांच्यासाठी छोटेखानी मराठी चित्रपटांसाठी राखीव सिनेमागृहाची संकल्पनाही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली.

ट्रेनी चालकांना प्रशिक्षणादरम्यान प्रती महिना 400 रुपयांपासून 2500 रुपये वाढवण्यास तत्वतः मान्यता देण्यात आलीय, ती पूर्णत्वास नेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

दिवाकर रावतेंची नक्षलवाद्यांशी चर्चा

दरम्यान, दिवाकर रावतेंनी नक्षलवाद्यांची भेट घेऊन चर्चा केली. नक्षलवाद्यांना समजून घेऊन मुख्य प्रवाहात आणण्याचं आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलं. त्यांनी नक्षलग्रस्त भागातल्या हल्ला झालेल्या मडके गावाला भेट दिली.

त्या ठिकाणी शिवसेनेच्या तालुका प्रमुखाची हत्या करण्यात आली होती. नक्षलवाद्यांनी शिवसैनिकाला मारलं हे विचारण्यासाठी रावतेंनी एका नक्षलवाद्याची जाऊन भेट घेतली. त्याच्याशी पाऊण तास चर्चा केली. या गावाच्या पाहणी दरम्यान रावतेंना जिवंत बॉम्ब सापडला होता. हा बॉम्ब घेऊन ते हिवाळी अधिवेशनात सभागृहात जाणार होते. पण त्यांना बॉम्बला हात लावू नये, असा सोबत असलेल्या नक्षलवाद्याने सल्ला दिल्याचं त्यांनी सांगितलं.