सांगली : सांगली पोलिसांच्या प्रतिमेला मोठ्या प्रमाणात तडा गेला होता, त्या कोल्हापूरमधील वारणानगर येथील सव्वा नऊ कोटीच्या रकमेवर डल्ला मारल्या प्रकरणी तपासाला सीआयडीने गती दिली आहे.

या प्रकरणातील संशयित निलंबित पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहाय्यक निरीक्षक सूरज चंदनशिवे, हवालदार दीपक पाटीलसह अन्य संशयितांना नोटाबंदीनंतरच्या काळात दोनशेहून अधिक जणांनी केलेल्या कॉलची सीआयडीने चौकशी सुरू केली आहे.

यात सांगली जिल्ह्यातील 92 हून अधिक जणांचा समावेश आहे. यामध्ये काही पोलीस अधिकारी, कर्मचारी, तसेच इतर व्यक्तींचा समावेश आहे. यामुळे सांगली पोलीस दलातील काही पोलीस कर्मचाऱ्यांबरोबर आणखी काही जणांचे धाबे दणाणले आहेत. आता गुन्ह्यातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अनिकेत कोथळे खून प्रकरण, मिरजमधील दाम्पताच्या आत्महत्या प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यावर दाखल झालेला गुन्हा या सर्वांमुळे अगोदरपासूनच चर्चेत असलेलं सांगली पोलीस दल पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

काय आहे प्रकरण?

सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दीड वर्षांपूर्वी मिरजेतील बेथेलहेम नगरमध्ये झोपडीवजा घरावर छापा टाकून तेथून 3 कोटींची रोकड जप्त केली होती. याप्रकरणी मैनुद्दीन मुल्ला यास अटक केली होती. चौकशीत त्याने ही रक्कम वारणानगर येथून चोरल्याची कबुली दिली होती.

गुन्हे अन्वेषण पथकाने मुल्लाला सोबत घेऊन वारणानगरला छापा टाकून तिथेही कोट्यवधींची रोकड जप्त केली. पण या कारवाईवेळी पथकाने सव्वा नऊ कोटींची रोकड परस्पर हडप केली. हा प्रकार तब्बल वर्षभरानंतर उघडकीस आला. या प्रकरणी तत्कालिन पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहाय्यक निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहाय्यक फौजदार शरद कुरळपकर, हवालदार शंकर पाटील, दीपक पाटील, कुलदीप कांबळे, रवींद्र पाटील यांच्याविरुद्ध कोडोली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. कुरळपकर वगळता सर्वजण सध्या कोल्हापुरातील कळंबा कारागृहात आहेत.

सध्या सीआयडीने चौकशी केलेल्या संशयित आरोपींमध्ये काही व्यक्तींसह पोलिसांचाही समावेश आहे. त्याशिवाय आतापर्यंत ज्यांची चौकशी करण्यात आली आहे, त्यांच्याकडून नोटाबंदीच्या काळातील बँकेचे स्टेटमेंटही घेण्यात येत आहे. कोणत्या कारणासाठी कॉल केले होते. तसेच संशयितांकडून काही रक्कम घेतली आहे का, याची चौकशी सुरू असल्याचं सांगण्यात आलं.

वारणानगर प्रकरणात सीआयडीने पुन्हा चौकशी सुरू केल्याने पोलीस वर्तुळातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत. यातील संशयितांनी जामिनासाठी अर्ज दाखल केले होते, मात्र ते फेटाळून लावले असल्याचीही माहिती आहे.