नागपूर : नागपूरच्या आरटीओ कार्यालयामध्ये वेळ संपल्यानंतर लर्निंग लायसन्स देण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे व्हीआयपी श्रेणीतल्या शिकाऊ वाहन चालक परवान्यांचा घोटाळा असल्याचा आरोप होत आहे. सरकारी कामकाजाची वेळ संपल्यानंतर म्हणजेच संध्याकाळी सहा वाजल्यानंतर अनेक तरुणांना लर्निंग लायसन्स देण्यात आले.

ऑनलाईन लायसन्सची प्रक्रिया ही संगणकाद्वारे केली जाते. यासाठी 14 संगणक आहेत. मात्र जे लायसन्स देण्यात आले आहेत, त्यांचे आयपी अॅड्रेस तपासले असता ते 51 संगणकांद्वारे करण्यात आल्याचं समोर आलं.

राज्यातील आरटीओ कार्यालयात लर्निंग लायसेन्सच्या ऑनलाईन प्रक्रियेत घोटाळा करणारे काही भ्रष्ट अधिकारी चोऱ्या घडवून आणि आग लावून कार्यालयीन पुरावे नष्ट करत असल्याचा आरोप होत आहे.

काय आहे लर्निंग लायसन्सची प्रक्रिया?

कामातील पारदर्शकता आणि डिजीटलायजेशन या कारणांपायी देशपातळीवर लर्निंग लायसन्स देण्याची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. त्यानुसार कोणत्याही व्यक्तीला लर्निंग लायसन्स हवे असल्यास त्याने परिवहन विभागाकडे ऑनलाईन अर्ज करुन लायसन्ससाठी ऑनलाईन परीक्षेसाठी पूर्वनियोजित वेळ (अपॉइंटमेंट) घ्यावी लागते.

त्या पूर्वनियोजित तारखेला आरटीओ कार्यालयात जाऊन लायसन्स हवं असलेल्या व्यक्तीला 15 गुणांची ( 15 प्रश्नांची ) ऑनलाईन परीक्षा द्यावी लागते. त्यामध्ये नऊ गुण मिळालेल्या व्यक्तीला जनरल (सामान्य) श्रेणीत लर्निंग लायसन्स बहाल केलं जातं.

काही मोजक्या लोकांना अतिआवश्यक कामांसाठी लायसन्स मिळवणं गरजेचं असल्यास संगणकीय प्रणालीमधून मिळालेली पूर्वनियोजित तारखेच्या आधी व्हीआयपी श्रेणीमध्ये लर्निंग लायसन्ससाठी आरटीओमध्ये बोलवून त्यांची ऑनलाईन परीक्षा घेता येते (मात्र ही व्हीआयपी श्रेणी मोजक्याच प्रकरणात वापरावी असा नियम आहे.).

लर्निंग लायसन्सचं काम हे बाहेरुनही इतर कोणीतरी करत असल्याचा दाट संशय आहे. या प्रकरणी आता उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. स्टॉल कंडक्टेड रिपोर्टमधून ही बाब उघड झाली आहे.

विशेष म्हणजे हा घोटाळा झाकण्यासाठी कार्यालयातील संगणकांचे सीपीयूही चोरण्यात आले. मात्र प्रणाली ऑनलाईन असल्यानं डेटा सुरक्षित राहिला आहे.