नागपुरात लग्नघराचा बँड वाजवणारी बबली गजाआड
एबीपी माझा वेब टीम | 02 Mar 2017 06:31 PM (IST)
नागपूर : रात्रीच्या अंधारात कोणाचीही नजर नसताना चोरी झाल्याच्या अनेक घटना ऐकायला मिळतात. मात्र दिवसाढवळ्या पाहुणचार घेऊन, लग्नघरात डल्ला मारुन पसार होणारी एक 'बबली' पाहून तुमचे डोळे पांढरे होतील. नागपुरातील विमल इंगळेच्या घरात अक्षरशः कुबेराचा खजिना सापडला आहे. महागडी घड्याळं, दुकानात नसतील इतक्या लेदर पर्स, कॉस्मेटिक्स, मोबाईल फोन्स आणि महागड्या साड्या असा सगळा मुद्देमाल विमल इंगळेंच्या घरी सापडला आहे. विमलचा कारनामा ऐकून भलेभले थक्क होतील. बाईंचा उद्योग एकच.. छान साडी नेसायची, मेकअप करायचा, सजून धजून कुणाच्याही लग्नात घुसायचं, चोरी करायची आणि रफूचक्कर व्हायचं. सगळं उत्तम चाललं होतं, पण जुलै महिन्यात राऊत कुटुंबाच्या लग्नामुळे सगळं बिंग फुटलं. पोलिस जेव्हा विमल इंगळेंच्या घरी पोहोचले, तेव्हा अख्खं कुटुंब याच धंद्यात असल्याचं उघड झालं. विमलच्या घरी सापडलेलं घबाड मांडताना अर्धा दिवस गेला. विमल इंगळे यांनी चोरीत करिअर करण्याआधी राजकारणातही हात आजमावला आहे. 2012 च्या पालिका निवडणुकीत या बाई अपक्ष म्हणून लढल्या आणि पडल्याही. विमल इंगळेनं नेमक्या किती लग्नांमध्ये पाहुण्यांचा बँड वाजवलाय, याचा आकडा उपलब्ध नाही. त्यामुळे तुमच्याही लग्नात पाहुण्यांचा ऐवज लंपास झाला असेल तर व्हिडीओ फुटेज चेक करा. कदाचित विमल इंगळेनं तुमचाही पाहुणचार घेतला असेल.