नागपूर : तब्बल चार महिन्यांचा प्रवास करुन घरी परतलेल्या टी-27 वाघिणीला ठार मारण्याच्या आदेशावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शिक्कामोर्तब केलं आहे. मात्र वन्यजीव प्रेमी या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याची माहिती आहे.


वन खात्यानं वाघिणीला नरभक्षक ठरवल्याने ती आता सर्वसामान्य नागरिकांसाठी धोकादायक ठरली आहे. त्यामुळे ती जंगलात असो वा बाहेर, तिला ठार मारण्याच्या आदेशावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं.

ज्या ठिकाणी माणसांवर हल्ले झाले, तिथे हीच वाघीण असल्याचं सिद्ध झालं आहे, शिवाय दुसऱ्या कोणत्याही वाघाचं अस्तित्व तिथे नसल्याने या वाघिणीला ठार मारणं गरजेचं असल्याचं मत वनविभागाच्या वकिलांनी मांडलं.

दरम्यान, या वाघिणीला वाचवण्यासाठी डॉक्टर जेरिल बानाईत हे सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. केंद्रीय मंत्री मेनका गांधींनीही या वाघिणीला मारु नये, म्हणून प्रयत्न केले आहेत. वाघिणीला जीवे न मारता, फक्त बेशुद्ध करुन जेरबंद करावं, यासाठी आपला खास शूटर वासिफ जमशेदला पाठवलं आहे.