नांदेडचा विजय हा खालच्या पातळीवरच्या प्रचाराला चपराक : चव्हाण
एबीपी माझा वेब टीम | 12 Oct 2017 01:44 PM (IST)
नांदेड महापालिकेत मिळालेल्या एकतर्फी विजयावर त्यांनी एबीपी माझाला पहिली प्रतिक्रिया दिली.
नांदेड : नांदेडच्या जनतेने विकासाच्या मुद्द्याला पाठिंबा दिला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. नांदेड महापालिकेत मिळालेल्या एकतर्फी विजयावर त्यांनी एबीपी माझाला पहिली प्रतिक्रिया दिली. नांदेडने पक्षावर आणि माझ्यावर विश्वास ठेवून एवढा विजय मिळवून दिला त्याबद्दल अशोक चव्हाण यांनी आभारही मानले. भाजपने खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला. जिंकण्यासाठी बाहेरचे लोकं आणले. भाजपला त्याचाच फटका बसला. मूळ गणित चुकल्यामुळे भाजपचा पराभव झाला, असंही अशोक चव्हाण म्हणाले. जे लोक भाजपचे नव्हतेच, त्यांना नांदेड महापालिका जिंकण्यासाठी जवळ करण्यात आलं. त्यामुळे भाजपचं धोरण अगोदरपासूनच चुकलं. भाजपने केलेल्या टीकेवर काहीही बोलणार नाही, असंही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं. नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. भाजपने अजून खातंही उघडलेलं नाही, तर काँग्रेस 81 पैकी 46 जागांवर आघाडीवर आहे. गेल्या निवडणुकीत 15 जागांवर विजय मिळवलेल्या एमआयएमचाही सुपडासाफ झाला आहे. संबंधित बातम्या :