मुंबई : 'घालीन लोटांगण'' भजनाचा गणपतीशी संबंध नाही? 'घालीन लोटांगण' भजनाची पदं एका कवीची नाहीत? 'घालीन लोटांगण'च्या चार कडव्यांचे चार वेगवेगळे कवी आहेत? हे प्रश्न वाचून तुम्ही विचारात पडला असाल. याबाबत कदाचित कधी फारसा विचारही केला नसेल. मात्र घालीन लोटांगण हे भजन एकट्या गणपती बाप्पासाठी नाही!
बाप्पाची आरती झाली, की सगळे जण तल्लीन होतात ते घालीन लोटांगणाच्या तालावर. पण या भजनात असलेली चारही कडवी एकाच कवीच्या लेखणीतून उतरली नसल्याचं समोर आलं आहे. प्रत्येक कडव्याचा इतिहास जाणून घेतला, तर ही गोष्ट लक्षात येईल.
घालीन लोटांगण, वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहीन रुप तुझें ।
प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन ।
भावें ओवाळीन म्हणे नामा
पहिलं कडवं लिहिलं आहे संत नामदेव यांनी. म्हणजेच हे कडवं 13 व्या शतकात लिहिलं गेलं आहे.
त्वमेव माता च पिता त्वमेव।
त्वमेव बंधुक्ष्च सखा त्वमेव ।
त्वमेव विध्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वं मम देवदेव
दुसरं कडवं 'त्वमेव माता पिता त्वमेव....' हे आहे शंकराचार्यांच्या गुरुस्तोत्रातलं. म्हणजेच ते आठव्या शतकात लिहिलं गेलं आहे.
कायेन वाचा मनसेंद्रीयेव्रा, बुद्धयात्मना वा प्रकृतिस्वभावात ।
करोमि यध्य्त सकलं परस्मे, नारायणायेति समर्पयामि
तिसरं कडवं आहे 'कायेनं वाचा मनसेंद्रीयेव्रा...' हे कडवं आहे श्रीमदभगवत पुराणातलं. त्यामुळे त्याचं शतक नेमकं सांगता येणार नाही.
अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचंद्र भजे
चौथं कडवं आहे 'अच्युतम केशवम'... हे आहे आदि शंकराचार्यांच्या अच्युताकष्टममधलं आहे. म्हणजे तेही आठव्या शतकातलं आहे.
हरे राम हर राम, राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे
या भजनाचा समारोप आहे 'हरे राम हरे राम...' म्हणजे हे पद ख्रिस्त जन्माच्या 1500 वर्षांपूर्वी लिहिलं गेलं आहे.
हे भजन एकट्या गणपती बाप्पासाठी नाहीच, तर ते प्रत्येक देवतेसाठी आहे. ते एकाने नाही, तर चार वेगवेगळ्या कवींनी लिहिल्याचं सिद्ध होत आहे. बाप्पाच्या भजनाचं हे मिश्रण श्रवणीय आहे. ते गाताना भक्त तल्लीन होतात. रचना कुणाचीही असो, कुणासाठीही असो. ती मनोभावे केली, तर देवापर्यंत पोहोचतेच.