Honey Singh : गाण्याच्या माध्यमातून अश्लीलता पसरवल्याचा आरोप असलेला रॅप गायक हनी सिंगच्या (Honey Singh) आवाजाचे नमुने रविवारी नागपूर पोलिसांनी घेतले आहेत. 2014 मधील एका प्रकरणानंतर न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांनी हनी सिंगच्या आवाजाचे नमुने घेतले आहेत.
बॉलिवूड गायक व रॅप गायक हनी सिंगविरुद्ध नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशन मध्ये 2015 साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. हनी सिंगने 2014 साली गाण्याच्या माध्यमातून अश्लीलता पसरवल्याचा आरोप त्यात लावण्यात आला होता. त्यामुळे नागपूरच्या एका वकिलाने त्याच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीवरून गायक हनी सिंग विरुद्ध भादवि कलम 294 आणि आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 2015 साली न्यायालयाने हनी सिंगला अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. याच प्रकरणात नागपूर पोलिसांनी हनिसिंगच्या आवाजाचे नमुने घेतले आहेत.
जानेवारी महिन्यात न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान हनी सिंगच्या आवाजाचे नमुने घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. यासाठी 4 ते 11 फेब्रुवारीपर्यंतचा अवधी हनी सिंगला पोलिसांनी दिला होता. त्यानुसार शनिवारी हनी सिंग त्याच्या आवाजाचे नमुने देण्यासाठी नागपुरात दाखल झाला होता. मात्र पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये आवाजाचे नमुने घेण्याचे यंत्र नसल्याने रविवारी हनी सिंगच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले.
रविवारी दुपारी सुमारे दोनच्या सुमारास हनी सिंग त्याच्या वकिलांसह पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात हजर झाला. पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आवाजाचे नमुने घेण्याचे यंत्र बोलावण्यात आले होते. सुमारे चार तास हनी सिंग हा कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आवाजाचे नमुने देण्यासाठी हजर होता. ज्या गाण्याच्या माध्यमातून अश्लीलता पसरवण्याचा आरोप हनीसिंग वर झाला होता त्याच गाण्याचे तीन नमुने हनी सिंगच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले. हनी सिंगच्या आवाजाचे हे नमुने आता पुढील तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवण्यात येणार आहेत.
संबंधित बातम्या
Rakhi Sawant : ड्रामा क्वीन राखी सावंत 'व्हॅलेंटाइन डे'च्या पूर्वसंध्येला पती रितेशपासून विभक्त, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती
Maharashtra Corona Update : राज्यात रविवारी 3 हजार 502 नव्या रुग्णांची नोंद, 17 जणांचा मृत्यू
ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र लांजेवार यांचे निधन, साहित्य क्षेत्रावर शोककळा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha