नागपूर : वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी नागपूर महापालिकेच्या बस कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. याचा सर्वाधिक फटका बारावीच्या विद्यार्थ्यांना बसत आहे. कारण आजपासून राज्यभरात बारावीच्या परीक्षा सुरु होत आहेत.


बारावीच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून दहा टक्के बस सुरु ठेवण्यात आल्याची माहिती कामगार संघटनेने दिली आहे. मात्र संपूर्ण शहराचा विचार करता विद्यार्थ्यांची यामुळे प्रचंड गैरसोय होत आहे.

दुसरीकडे संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मेस्मा (महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल अधिनियम ) लावण्यात आला आहे. या कारवाईला कोर्टात आव्हान देणार असल्याची माहिती भारतीय कामगार सेनेचे नेते बंडु तळवेकर यांनी दिली आहे.

बस कर्मचारी संपावर गेल्यामुळे रिक्षाचालकांकडून नागरिकांची लूट सुरु आहे. जास्तीचे दर आकारुन नागपूरकरांची लूट केली जात आहे. त्यामुळे बस कर्मचाऱ्यांच्या संपावर महापालिका काय तोडगा काढते, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.