मुंबई : राज्यभरात सुरु होणार्‍या बारावीच्या परीक्षेला एक मिनिटही उशिरा येणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेतच परीक्षा केंद्रावर येण्याचं आवाहन बोर्डाकडून करण्यात आलं आहे.

विद्यार्थ्यांना 11 वाजेपर्यंतच परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार आहे. अकरा वाजेनंतर आलेल्या विद्यार्थ्यांना अपवादात्मक परिस्थिती लक्षात घेऊनच परीक्षा केंद्रांत प्रवेश दिला जाईल अन्यथा प्रवेश नाकारला जाईल. असे मंडळाने स्पष्ट केले आहे.

बारावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातील नऊ विभागीय मंडळातून तब्बल 14 लाख 85 हजार 132 विद्यार्थी बसणार आहेत. राज्यभरातील 9486 कनिष्ठ महाविद्यालयातील हे विद्यार्थी आहेत. मुंबई विभागीय मंडळातून 3 लाख 30 हजार 823 विद्यार्थी बसणार आहेत. राज्यात 2822 परीक्षा केंद्र असणार आहेत. तर मुंबई विभागात 586 केंद्र असणार आहेत. परीक्षा काळात होणार्‍या गैरप्रकरांना आळा बसावा या दृष्टीने मंडळामार्फत प्रत्येक जिल्ह्यासाठी 7 याप्रमाणे राज्यात एकूण 252 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. या शिवाय प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या स्थापन केल्या आहेत.

दहावी आणि बारावीला विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात 10.30 वाजता प्रवेश दिला जातो. तर 10.40 मिनिटांनी त्यांना उत्तरपत्रिकांचे वाटप करण्यात येते. तर 10.50 वाजता त्यांना प्रश्नपत्रिकांचे वाटप केले जाते. तर उत्तरपत्रिका लिहण्यासाठी 11वाजता सुरु करण्यात येते. त्यामुळे परीक्षा सुरु झाल्यानंतर परीक्षार्थींना प्रवेश दिला जाणार नाही. असे मंडळाने स्पष्ट केले आहे.

तातडीची कारणे, आपत्त्कालीन परिस्थिती सोडून विद्यार्थ्यांला परीक्षागृहबाहेर जाण्यास परवानगी नाही. अपवादात्मक परिस्थितीत जर परीक्षागृहातून बाहेर जावयाचे असेल तर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका जमा करावी लागणार आहे. पहिलाच पेपर बुधवारी इंग्रजीचा होणार आहे. सर्वच शाखांना हा विषय अनिवार्य असल्याने बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांचा प्रारंभ होणार आहे. 20 मार्चपर्यंत बारावीची परीक्षा चालणार आहे.

संबंधित बातम्या :

भरारी पथकांची संख्या वाढवली, उद्यापासून बारावीची परीक्षा