नागपूर : संत्रानगरीच्या शासकीय इमारतींना 'ऑरेंज' रंग देणं सुरु आहे. काही नागपूर महानगरपालिका शाळांपासून सुरुवात करण्यात आली असून आता मेट्रोलाही हा रंग द्यायला सांगणार का हा प्रश्न पडला आहे.


 
ऑरेन्ज सिटी.... संत्र्यामुळे नागपूरला मिळालेली ही ओळख. मात्र संत्र्याला बाजूला ठेवून नागपूर ऑरेन्ज, म्हणजेच भगव्या रंगासाठी ओळखलं जावं म्हणून महापालिकेनं हा खटाटोप सुरु केला आहे. याची सुरुवात झाली आहे ती महापालिकेच्या शाळांपासून.

 

नागपूरच्या स्वामला आणि विवेकानंदनगर शाळेच्या भिंतीचं भगवीकरण करण्यात आलं आहे. जयपूर पिंक सिटी, जोधपूर गोल्डन सिटी तर उदयपूर व्हाईट सिटी म्हणून ओळखलं जातं. तसंच नागपूर भगव्या रंगासाठी ओळखलं जावं अशी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांची मनिषा आहे. मात्र हा भगवा रंग संत्र्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरण्यात येणार आहे, की राजकीय विचारधारेचं, अशी शंकेची पाल विरोधकांच्या मनात चुकचुकतेय.

 

लवकरच नागपूरमध्ये मेट्रो धावणार आहे. तिच्या लोगोमध्येही लक्षवेधक असा भगवा रंग वापरण्यात आला आहे. पहिल्याच टप्प्यात नागपूरचं भगवीकरण कुणाच्या डोळ्यात खुपू नये म्हणून त्यात थोडासे सामंजस्याचे रंगही मिसळण्यात आले आहेत. मात्र हा ऑरेंज सिटीचा रंग आहे, भगवाकरण नाही, असे भाजपाशासित महानगर पालिकेचे म्हणणे आहे