भंडारा : गर्भवतीचं अपहरण करुन तिच्यावर सलग पाच दिवस अत्याचार केल्याची धक्कादायक घटना भंडाऱ्यात उघडकीस आली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरुन करडी पोलिसांनी दोन नराधमांना अटक केली आहे.

 
दिलीप शेंडे आणि गणेश शेंडे या दोन आरोपींनी 4 महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेचं अपहरण करुन तिच्यावर आळीपाळीने सतत पाच दिवस बलात्कार केल्याचा आरोप आहे.

 

 

सुरेवाडा येथील पीडित महिला ही मोहाडी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या निलज गावात आईकडे गेली होती. तिथून सूरेवाडाला सासरी परत येत असताना तिच्या भावाने तिला करडीपर्यंत सोडलं. त्यावेळी आरोपी दिलीप शेंडेने तिला पाण्यातून गुंगीचे औषध देऊन तिचं अपहरण केलं. ती शुद्धीवर आली तेव्हा तिच्यावर एका जंगलात बलात्कार झाल्याचं तिच्या लक्षात आलं.

 
'मी गर्भवती आहे, मला सोडून द्या' असे सांगितल्यावरही या नराधमांनी तिला त्यांच्या गावी नेलं आणि सतत पाच दिवस तिच्यावर बलात्कार केला.
त्यानंतर त्यांनी तिला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवत 12 दिवसांनी भंडारा ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये आणलं. इतकंच नाही तर ही महिला पतीच्या दारुच्या आणि मारण्याच्या त्रासाला कंटाळल्यामुळे आत्महत्या करीत होती आम्ही तिला वाचवले असं पोलिसांना सांगितलं. मात्र पोलोसांच्या तपासात या नराधमांनीच तिच्यावर बलात्कार केल्याचं समोर आलं.

 
माहेरुन परत निघूनही घरी पोहचलीच नसल्याने तिच्या पतीने करडी पोलिसात हरवल्याची तक्रार दिली. अपहरण आणि बलात्काराची घटना समोर आल्यानंतर महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करुन गुन्हा नोंदवला आहे.