नागपूरमधल्या भाजपच्या नाराजांचा गडकरी वाड्याबाहेर गोंधळ
एबीपी माझा वेब टीम | 03 Feb 2017 12:20 PM (IST)
नागपूर: नागपूरमधल्या भाजपच्या नाराजांनी गडकरी वाड्याबाहेर गोंधळ घातला. महापालिकेचे उमेदवार निश्चितीसाठी सकाळी गडकरी वाड्यावर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्व प्रभागांच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यानंतर उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप सुरु असताना वाड्याबाहेर नाराजांनी गोंधळ घातला. प्रभाग 22 मधून श्रीकांत आगलावे यांना उमेदवारी न दिल्यानं त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसंच प्रभाग 24 मधून चेतना टांक यांना उमेदवारी न मिळाल्यानं महिला कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचं चित्र पाहायला मिळालं. ‘पक्षाने थोपवलेले उमदेवार चालणार नाही. त्यांना पाडू’, अशी घोषणाबाजी गडकरी वाड्याबाहेर सुरु आहे. दरम्यान, गडकरी वाड्यातील बैठक संपली असून सर्व नावं निश्चित झाली असून उमेदवारांनी फॉर्म भरणं सुरु केलं आहे. यासंदर्भात 4 वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. दरम्यान, काल मुख्यमंत्री आणि गडकरींमध्ये तब्बल तीन तास बैठक सुरु होती. दुपारी गडकरी वाड्यावर झालेल्या बैठकीला केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नागपूरमधील सर्व आमदार उपस्थित होते. संबंधित बातम्या: नागपुरात गडकरी-मुख्यमंत्र्यांची बैठक, मात्र उमेदवार यादी नाहीच