नागपूर : खरं तर नेता म्हटलं की आपल्यासमोर चित्र येतं ते हायफाय गाडी.... करकरीत कपडे.... पण नागपूरमध्ये नेत्यांच्या या व्याख्येला अपवाद असणारी एक व्यक्ती आहे. ती म्हणजे गोपीचंद कुमारे. कुमारे हे दिवसभर लोकांची कामं करतात तर संध्याकाळी सॅण्डविचची गाडी लावतात. फक्त सॅण्डविचवाला एवढीच त्यांची ओळख नाही तर ते चक्क नागपूर महापालिकेतील भाजपचे नगरसेवक आहेत.

फक्त बारावी पास असलेले गोपीचंद उत्तर नागपूर येथील प्रभाग ३ मधून भाजपच्या तिकीटावर निवडून आले आहेत. तर यापूर्वीच्या टर्मला त्यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला होता. दिवसभर राजकारण आणि प्रभागाची काम केल्यानंतर संध्याकाळी ५ वाजता न चुकता गोपीचंद सँण्डविचच्या ठेल्यावर येतात.

गोपीचंद यांना राजकारणाला लागणारा पैसा सॅण्डविचच्या व्यवसायातून मिळतो. घर हेच गोपीचंद यांचं ऑफीस आहे. फक्त सॅण्डविचचा धंदाच ते उत्तम करतात असं नाही तर वॉर्डातही त्यांनी अनेक विकासकामं केली आहेत. मग नाला खोलीकरणाचं काम असो की सिमेंटचे रस्ते असो की स्वच्छता... वॉर्ड आगदी टापटीप आहे.

एखादा नगरसेवक झाला की त्याचं आयुष्य बदलून जातं. नगरसेवकाच्या कपड्याची घडीही मोडत नाही. आलिशान घर, आलिशान गाडी येते. संपत्ती किती पटीनं वाढते याचा विचारही न केलेला बरा. अशा भ्रष्टाचाराच्या चिखलानं बरबटलेल्या राजकारणात अशी काही चांगली लोकं असतील तर नक्कीच त्यांचं कौतुक आहे.