नागपूर : तुम्ही नेहमी हिंदू धर्मातील सणांनाच विरोध का करता, असा सवाल उपस्थित करत मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने याचिकाकर्त्याला फटकारलं आहे. तुम्ही याचिका मागे घ्या किंवा मग दंड भरा असा दमच हायकोर्टानं भरल्यानंतर याचिकाकर्त्यांनी याचिका मागे घेतली.
'नागपूरच्या नागरी हक्क संरक्षण मंच'चे जनार्दन मुन यांनी ही याचिका दाखल केली होती. लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या गणेशोत्सवाला यंदा 125 वर्ष झाली आहेत. यानिमित्त राज्य सरकारने स्पर्धांचे आयोजन केले आहे. उत्कृष्ट सजावट, उत्कृष्ट मूर्तीकार अशा स्पर्धांना लाखो रुपयांचे पारितोषिकही ठेवण्यात आले आहे.
या स्पर्धांवर होणाऱ्या खर्चाला याचिकाकर्त्यांचा आक्षेप होता. एका विशिष्ट धर्मासाठी पुरस्काराची घोषणा करणं हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे असा तर्क याचिकाकर्त्याने मांडला. इतर धर्मियांच्या तीर्थक्षेत्रांना सरकार जेव्हा मदत करते तेव्हा का याचिका करत नाही असा सवालही कोर्टानं विचारला.