नागपूर : नागपूरच्या आमदार निवासात झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणानंतर पोलिस तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. पीडित अल्पवयीन तरुणीला फसवून आमदार निवासात आणून बलात्कार केला आहे. मात्र यामुळे नागपुरातील
आमदार निवासाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

नागपूरचं आमदार निवास आहे की कुंटनखाना असा प्रश्न पडला आहे. आमदार निवासातील 320 क्रमांकाच्या रुममध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. पीबी ज्वेलर्सचा मालक मनोज भगत आणि केबल दुरुस्ती करणारा रजत मद्रे यांनी मिळून हे दुष्कृत्य केलं.

नागपूरच्या आमदार निवासात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार


मनोज भगतच्या दुकानात काम करणाऱ्या 17 वर्षीय मुलीवर रजतची नजर होती. मनोज भगतनं पीडितेच्या घरी खोटं कारण सांगितलं. मुलीला कुटुंबासह भोपाळला घेऊन जातो अशी फूस लावली आणि आमदार निवास बूक केलं.

मनोज भगत यानं रजतसाठी सर्व व्यवस्था केली होती. पण एकट्या मुलीला पाहून मनोजची नियत फिरली आणि दोघांनी मिळून पीडित मुलीवर सामूहिक बलात्कार केला.

14 एप्रिल ते 17 एप्रिल चार दिवस आमदार निवासात मुलीवर बलात्कार होत होता. या काळात मुलीची तब्येत बिघडली. तिला फिगो कार (एमएच 31 ईके 5408) ने हॉस्पिटलमध्ये नेऊन पुन्हा आमदार निवासात आणलं. पण इथल्या व्यवस्थापनाला त्याची
पुसटशी कल्पनाही नव्हती.

नागपूरमधील धक्कादायक प्रकारानंतर आमदारांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आमदार नसताना लोकांच्या सोईसाठी हे निवासस्थान माफक भाडं घेऊन सामान्यांना उपलब्ध होतं. पण अशा पद्धतीनं आमदार निवासाचा गैरवापर होत असेल तर हे चिंताजनक आहे.