Maharashtra Politics: पाच महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपने सत्ता स्थापन केली. शिवसेनेत उभी फूट पडल्याने राज्यातील राजकारणात मोठा भूकंप झाला होता. शिवसेना नेतृत्वाविरोधात बंड केल्यानंतर शिंदे गट (Shivsena Shinde Faction) हा सूरत मार्गे गुवाहाटीत (Guwahati)दाखल झाला होता. त्यानंतर आज शिंदे गट पुन्हा एकदा कुटुंबासह कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीमध्ये दाखल झाला आहे. मात्र, या दौऱ्यातून काही मंत्री, आमदार, खासदार अनुपस्थित आहेत. त्यापैकी काहींनी वैयक्तिक कारणांमुळे गुवाहाटीला जाणार नसल्याचे म्हटले आहे.


शिंदे गटाच्या बंडात आधीपासून सहभागी असणारे अब्दुल सत्तार यांनीदेखील दौऱ्याकड पाठ फिरवली. आधीच निश्चित असलेल्या कार्यक्रमांमुळे आपण गुवाहाटीला गेलो नसल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हटले. आपण सरकारवर नाराज नाही, असेही त्यांनी म्हटले.  तर, राज्याचे मंत्री शंभुराज देसाईदेखील यांनीदेखील गुवाहाटी दौऱ्याकडे पाठ फिरवली. देसाई यांच्या घरातील एक लग्नकार्य असल्याने त्यांनी गुवाहाटीला जाणे टाळले असल्याचे म्हटले जात आहे. तर, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनीदेखील आपल्या नियोजित कार्यक्रमामुळे गुवाहाटीला जाणे टाळले असल्याचे म्हटले जात आहे. परांडा येथे 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी आरोग्य शिबीर असल्याने ते देखील गुवाहाटीला गेले नाहीत. 


त्याशिवाय, मंत्री गुलाबराव पाटील हे देखील गुवाहाटीला गेले नाहीत. दूध संघ निवडणूक माघारीची तारीख असल्याने यावेळी उपस्थित राहणे गरजेचे असल्याचे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. 


सातारा कोरेगावचे आमदार महेश शिंदे हे देखील गुवाहाटीला गेले नाहीत. आमदार शिंदे हे सातारा कोरेगावमध्ये असल्याची माहिती आहे. दुसरीकडे मुक्ताई नगर येथील आमदार चंद्रकांत पाटील हे देखील गुवाहाटीला गेले नाहीत. कुटुंबात लग्नकार्य असल्याने आणि प्रकृतीही बरी नसल्याने आपण गुवाहाटी दौऱ्यात गेलो नसल्याचे कारण आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. 


सांगलीतील खानापूर-आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांनी गुवाहाटी दौरा रद्द केला आहे. कौटुंबिक कारणामुळे आमदार बाबर हे गुवाहाटीला जाणार नाहीत. आपल्याला मंत्रिपद मिळाले नसल्याने कोणतीही नाराजी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चार महिन्यापूर्वी त्यांची पत्नी शोभा बाबर यांचे निधन झाले होते. शोभा बाबर यांची जयंती असल्याने त्यांनी गुवाहाटीऐवजी घरी थांबण्यास प्राधान्य दिले आहे.
 
शिंदे गटास सामिल झालेले कोल्हापूरमधील दोन्ही खासदारदेखील गुवाहाटीला गेले नाहीत. संजय मंडलीक आणि धैर्यशील माने हेदेखील या दौऱ्यासाठी अनुपस्थित आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे हे देखील गुवाहाटीला गेले नाहीत.