नागपूर : स्कूल व्हॅनने आपल्या चिमुकल्यांना शाळेत पाठवणाऱ्या प्रत्येक पालकाची चिंता वाढवणारी बातमी आहे. कारण नागपुरात एका नराधम व्हॅन चालकाने गाडी निर्जन स्थळी थांबवून सहा वर्षीय विद्यार्थिनीसोबत लैंगिक चाळे करण्याचा प्रयत्न केला. आशिष वर्मा असं आरोपी स्कूल व्हॅन चालकाचं नाव आहे.


मंगळवारी (10 जुलै) दुपारी तीन वाजता विद्यार्थ्यांना शाळेतून घेतल्यानंतर आशिष वर्मा विद्यार्थ्यांना घरी सोडत होता. व्हॅनमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असे दोनच विद्यार्थी राहिले होते. त्यावेळी आशिषने स्कूल वॅन निर्जन ठिकाणी उभी करत, मुलाला चिप्स आणायला जवळच्या दुकानात पाठवलं. व्हॅनमध्ये इतर विद्यार्थी नसल्याचा फायदा घेत, सहा वर्षीय विद्यार्थिनीला मागील सीटवर नेत तिच्याशी लैंगिक चाळे सुरु केले.

सुदैवाने हा प्रकार तिथून जाणाऱ्या एका महिलेच्या नजरेस पडला. तिने धाडस करत व्हॅन चालकावर थेट हल्ला चढवत त्याला बाहेर काढलं. आरडाओरडा ऐकून परिसरातील लोक तिथे जमा झाले आणि त्याने आरोपी व्हॅन चालकाला रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारहाण केली. त्यावेळी कोणीतरी पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीची जमावाच्या तावडीतून सुटका करत त्याला अटक केली.

दरम्यान, पीडित विद्यार्थिनी या प्रकारामुळे प्रचंड घाबरली असून तिची काऊन्सलिंग केलं जात आहे. विशेष म्हणजे आरोपी व्हॅन चालक पीडितेच्या घराजवळच राहणारा आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून एका खाजगी कॉन्व्हेंट शाळेसाठी व्हॅन चालवतो.