N. D. Patil Passed Away : महाराष्ट्राने एक संघर्षशील नेतृत्व गमावले आहे. महाराष्ट्रासाठी त्यांचे नेतृत्व प्रेरणादायी होते," अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली. ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, शेतकरी व कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज हरपला आहे. अखंड महाराष्ट्रात बेळगावसह सीमा भाग यावा हा त्यांचा ध्यास होता. एन. डी. पाटील यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे अतोनात नुकसान झाले असून मी त्यांना महाराष्ट्र राज्यातर्फे आणि शिवसेनेतर्फे अभिवादन करतो.
सीमाभागातील मराठी भाषक बांधवांचा आधारवड कोसळला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील साहेब यांच्या निधनानं शेतकरी, शेतमजूर,आदिवासी, कष्टकरी, दुर्बल, वंचित,उपेक्षित बांधवांसाठी लढणारं संघर्षशील नेतृत्वं हरपलं आहे. वयाच्या नव्वदाव्या वर्षीही रस्त्यावर उतरुन संघर्ष करणाऱ्या प्रा. एन. डी. पाटील साहेबांचं निधन ही महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीची मोठी हानी आहे. आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकारमध्ये त्यांनी सहकारमंत्री म्हणून काम केलं. आमदार म्हणून काम केलं. धानमंडळातील प्रत्येक क्षण आणि प्रत्येक शब्द हा वंचित बांधवांना हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी उपयोगात आणला. त्यांचं निधन हे महाराष्ट्रातल्या, सीमाभागातल्या प्रत्येक कुटुंबाची हानी आहे.
महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेते प्राध्यापक एन.डी.पाटील यांचं निधन झालं आहे. ते 93 वर्षांचे होते. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. ब्रेन स्ट्रोक आल्यानं गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूरमधील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. वातावरणात बदल झाल्याने त्यांना थोडी कणकण वाटत होती. त्यामुळे एन.डी. पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र या वयातही एन. डी. पाटील यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. मात्र यावेळी त्यांची मृत्यूची झुंज अपयशी ठरली.
संबंधित बातम्या :
N. D. Patil : एनडींनी घोषणा दिली, टोलची खोकी पंचगंगेत बुडवू, जे देशात कुणालाही जमलं नाही ते एन डींनी करुन दाखवलं!
मी आत्याला मस्करीत म्हणायचे, एन डी मामांबरोबर संसार करतेस, तुला अॅवॉर्डच द्यायला हवा : सुप्रिया सुळे