Pune Chandani Chowk Bridge Demolition : पुण्यातील (Pune) वाहतुकीस अडथळा असलेला चांदणी चौकातील (Chandani chowk)  पूल पाडण्याची तारीख अखेर जाहीर झाली आहे. येत्या 2 ऑक्टोबरला हा पूल पाडण्यात येणार आहे. पुण्यातील वाहतुकीस हा पूल अडथळा ठरत होता. पुणेकरांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे हा पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 2 ऑक्टोबर रोजी हा पूल इतिहास जमा होणार आहे. पूल पाडल्यानंतर आवश्यक पर्यायी रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे


18 सप्टेंबरला पाडण्यात येणार होता पूल -
सततच्या पावसामुळे आणि त्या पुलावर असलेल्या पाण्याची पाईपलाईन वळवण्याच्या कामामुळे पुढे ढकलण्यात आलं होतं. त्याशिवाय या पुलावर असलेल्या सगळ्या सेवावाहिन्या स्थलांतर करण्याचे काम रखडले होतं. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे हा पूल पाडण्यासाठी किमान आठ दिवस उशीर होण्याची शक्यता आहे, असं देखील सांगण्यात आलं होतं. चांदणी चौकातील या पुलावर अनेक सेवावाहिन्या आहेत. महापालिकेच्या माध्यामातून यातील काही सेवा वाहिन्या काढण्यात आल्या आहेत किंवा काही वळवण्यात आल्या आहेत. ज्या वाहिन्यांचं काम शिल्लक आहे. ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी महापालिकेकडे करण्यात आली होती. त्यामुळे जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पूल पाडता येणार नसल्याचं भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आलं होतं. हे काम पूर्ण झाल्याने पूल पाडण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. 


स्फोटकं लावण्याचं काम सुरु -
काही दिवसांपूर्वीच हा पूल पाडण्यासाठी जोरदार तयारी सुरु होती. या पूलाच्या खालच्या भागात मोठे होल्स करुन त्यात स्फोटकं लावण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. काही प्रमाणात हे काम पूर्ण झालं आहे. मात्र सेवावाहिन्यामुळे काही काम शिल्लक आहे. दोन दिवसांपूर्वी लहान पहिला ब्लास्ट करण्यात आला होता. त्याचा अंदाज घेत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पूल पाडण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी नोएडा शहरातील ट्विन टॉवर जमीन दोस्त करण्यात आला होता. त्याच कंपनीला हा पूल पाडण्याचं काम देण्यात आलं आहे. Edifice engineering या कंपनीची NHAI ने निवड केली आहे. त्याच तंत्रज्ञानाचा वापर करुन पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यात येणार आहे. हा पूल 10 सेकंदात पाडण्यात येणार आहे. स्फोटानंतर अवघ्या आठ ते दहा सेकंदांमध्ये हा पूल जमीनदोस्त होणार आहे. पण त्यानंतर जो राडारोडा तयार होणार आहे तो हटवण्यासाठी आठ ते दहा तास लागणार आहेत.