मुंबई : दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा (Dasara Melava) घेण्यासाठी आज उच्च न्यायालयाने शिवसेनेला परवानगी दिली. कोर्टाच्या या निर्णयानंतर राज्यभरात शिवसैनिकांनी जल्लोष केला. काही ठिकाणी पेढे वाटले. तर काही ठिकाणी गुलालाची उधळण करत शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात देखील शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला. शिवसैनिकांकडून मातोश्रीवर देखील जल्लोष साजरा करण्यात आला. मातोश्रीवर मोठ्या प्रमाणावर महिला शिवसैनिक उपस्थित होत्या.  उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी महिला कार्यकर्त्यांसोबत सेलिब्रेशन केलं. आज रश्मी ठाकरे यांचा वाढदिवस असल्यानं त्यांना महिला शिवसैनिकांनी शुभेच्छा दिल्या. शिवाय जोरदार घोषणाबाजीही केली. 


पैठण (Paithan) येथे आतषबाजी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कात दसरा मेळावा घ्यायची परवानगी मिळाली आणि बंडखोर आमदाराच्या मतदारसंघातही शिवसेना समर्थकांनी जल्लोष केला. मंत्री संदिपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात ठाकरे गटातील शिवसैनिकांनी आतिषबाजी केली.  
 
बुलढाण्यात (Buldhana )  पेढे वाटून जल्लोष 


शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा?  याचा फैसला आज न्यायालयाने दिला. न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसैनिकांनी बुलढाण्यात पेढे वाटून आनंद साजरा केलाय. तर सत्य परेशान होता है पराजित नही, अशाप्रकारे विरोधकांना टोला लावत न्यायालयाचे अभिनंदन आणि आभार ही व्यक्त केले.  


औरंगाबादमध्ये (Aurangabad) साखर वाटून आनंदोत्सव 
शिवसेनेच्या बाजून निकाल दिल्यानंतर औरंगाबादमध्ये शिवसेना नेते चंद्रकांत खैरै यांनी एकच जल्लोष केला. एकमेकांना साखर वाटत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.


पुण्यात (Pune) फटाके फोडले 
पुण्यात शिवसैनिकांनी फटाके फोडत जल्लोष केलाय. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.


सिंधुदुर्गमध्ये(Sindhudurg) जोरदार घोषणाबाजी                     


शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचा दसरा मेळावा घेण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर तळकोकणातील शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांच्या होम ग्राउंडवर सावंतवाडीत शिवसैनिकांनी जल्लोष करत फटाक्यांची आतोषबाजी केली. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.


जळगांवमध्ये (Jalgaon) जल्लोष
न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाकडून निकाल दिल्यानंतर शिवसैनिकांनी जळगावत पेढे वाटप करत फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला. शिवसेना ही बाळासाहेबांचीच असून निकाल हा सत्याच्या बाजूने लागलेला आहे. सत्य परेशान होता है पराजित नही, अशा भावना याप्रसंगी शिवसेना पदाधिकाऱ्यांन व्यक्त केल्या आहेत. शिवाजी पार्क हा आमचाच असल्यामुळे आता आम्ही मोठ्या संख्येने दसरा मेळाव्यासाठी जळगावातून रवाना होऊ अशी माहिती यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे महानगर प्रमुख शरद तायडे यांच्यासह कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती.