मुंबई : महाविकास आघाडीतून (Maha Vikas Aghadi) वंचित बहुजन बाहेर पडणार की वंचित बहुजन आघाडीसह महाविकास आघाडी (MVA Seat Sharing) आगामी निवडणुकांना सामोरे जाणार याकडे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. कारण शरद पवार यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत वंचितबद्दल काय भूमिका घ्यायची यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची शुक्रवारी बैठक पार पडली. या बैठकीला ठाकरे गटाकडून संजय राऊत, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, नाना पटोले उपस्थित होते. या बैठकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या प्रस्तावाबाबत चर्चा केली.


वंचितची काँग्रेसलाच सात जागांची ऑफर


नुकतेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पत्र प्रसिद्ध करत थेट काँग्रेसलाच 7 जागांना पाठिंबा देण्याबाबतचा प्रस्ताव देण्यात आला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आपल्या घटक पक्षांची मते समजून घेतली. यावेळी उपस्थित काही नेत्यांनी वंचित बहुजन आघाडी बाबत स्पष्ट भूमिका घ्यावी अशी मागणी केली. 


वंचित सोबत आली तर चार जागा देणार


एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसांत वंचित बहुजन आघाडीबाबत भूमिका घेण्यात येणार आहे. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीच्या वतीने चार जागांचे प्रपोजल देण्यात आले आहे. जर वंचित बहुजन आघाडी सोबत आली तर काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कोट्यातील प्रत्येकी दोन जागा देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. यासोबतच जर राजू शेट्टी आणि राष्ट्रीय समाज पक्ष  सोबत आला तर राष्ट्रवादीच्या कोट्यातील प्रत्येकी एक जागा देण्याचा निर्णय झाल्याची देखील माहिती आहे.


सांगली, मुंबईतील जागेवरून वाद कायम


एकीकडे वंचित बहुजन आघाडीबाबत चर्चा सुरु असताना दुसरीकडे सांगली, रामटेक, भिवंडी, मुंबई उत्तर पश्चिम आणि दक्षिण मध्य मुंबई याबाबत देखील चर्चा पार पडली. सध्या काँग्रेसने भिवंडी लोकसभेसाठी मागणी केली असली तरी शरद पवार यांच्यावतीने भिवंडी लोकसभेसाठी दावा कायम ठेवण्यात आला आहे. सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना तयारी करण्याचे आदेश पवारांनी दिले आहे. सांगली, रामटेक, उत्तर पश्चिम मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईचा वाद अद्याप कायम आहे.


एकंदरीतच महाविकास आघाडीच्या जागा वाटपांचा मुद्दा दोन दिवसांत मार्गी लागणार असला तरी वंचित बहुजन आघाडी सोबत येण्याची शक्यता मावळताना दिसत आहे. कारण वंचित बहुजन आघाडीने तिसरी आघाडी करण्याकडे लक्ष दिल्याचं समोर येतंय. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्यासोबत चर्चेच्या दोन फेऱ्या पार पडल्याचीही माहिती आहे. 


ही बातमी वाचा :