MVA Lok Sabha Seat Sharing : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर युतीसह आघाडीतील सर्वच पक्षांकडून जागावाटप सुरु आहे. आता महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) जागावाटपासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीमध्ये जळगाव (Jalgaon), कोल्हापूर (Kolhapur) लोकसभा मतदारसंघाचा (Lok Sabha Constituency) तिढा सुटला आहे. आता महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघावरून चुरस असल्याचं समोर आलं आहे.
जळगाव, कोल्हापूरचा तिढा सुटला
महाविकास आघाडीमधील वरिष्ठ नेत्यांच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत सर्व 48 जागांवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाविकास आघाडीमध्ये जळगाव आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सांगली आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाची बैठक बोलवली आहे. महाविकास आघाडीमध्ये हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ शिवसेना लढवण्याच्या तयारीत आहेत.
जळगाव मतदारसंघ ठाकरे गटाकडे
जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटासोबत राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा ही जागा लढवण्यासाठी आग्रही होते. मात्र, आता जळगाव लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे लढवणार हे जवळपास निश्चित झालं आहे. हर्षल माने शिवसेना ठाकरे गटाचे संभाव्य लोकसभा उमेदवार असतील, असं सांगितलं जात आहे.
त्याशिवाय, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गट काँग्रेस पक्षाला सोडणार असून त्याऐवजी शिवसेना ठाकरे गट सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा लढवण्यावर महाविकास आघाडीचे नेत्यांमध्ये एकमत होत आहे.
कोल्हापुरात श्रीमंत शाहू छत्रपती मविआचे संभाव्य उमेदवार
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर श्रीमंत शाहू छत्रपती हे ते महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार आहेत. शाहू महाराज हे काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवू शकतात तर सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाकडून माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे संभाव्य उमेदवार असतील.
सांगली लोकसभा मतदारसंघासाठी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील सुद्धा इच्छुक आहेत. वंचित बहुजन आघाडीने सांगलीच्या जागेसाठी चंद्रहास पार्टी यांच्या उमेदवारीच्या नावाला पाठिंबा दर्शवला आहे.
महाविकास आघाडीची रामटेक आणि दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघ कोणता पक्ष लढवणार यावर अजूनही चर्चा सुरू आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघ लढवण्यावर शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे तिन्ही पक्ष ठाम आहेत. तर, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट ही जागा लढवण्यावर अजूनही आग्रही आहेत.