मुंबई : मुस्लिमांचे आरक्षण रद्द करणाऱ्या फडणवीस- शिंदे सरकारने राज्यातील 56 शहरांत मुस्लिम कुटुंबाचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. नऊ वर्षापासून हे सर्व्हेक्षण रखडले होते. उत्तर प्रदेश मध्ये मदरशांचे सर्वेक्षण सूरू आहे. सरसंघचालक मोहन भागवत हे दोन धर्मातला तणाव कमी करण्यासाठी देशांतल्या मुस्लिम नामवंतांच्या भेटी घेत आहेत. त्यामुळे भाजपा आणि संघ मुस्लिमांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या सर्वेक्षणाचा कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
शिंदे फडणवीस सरकार नांदेड-औरंगाबाद-सोलापूर सारख्या 56 शहरात मुस्लिमांचे पाहणी करणार असल्याची माहिती आहे. मुस्लिम कसे राहतात? त्यांचे शिक्षण, मुस्लिम वस्तीतल्या पायाभूत सुविधा, आरोग्य, रोजगार, बँका आणि वित्तीय सहाय्य, शासकीय योजनांचा लाभ अशी माहिती संकलित केली जाणार असल्याची माहिती आहे.
सन 2013 मध्ये राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार होतं, तेव्हा मोहंमद उर रहमान यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम समुदायाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी अभ्यास गट नेमला होता. या अभ्यास गटाने मुस्लिम समुदायाची पाहणी करण्यात यावी अशी राज्य सरकारला शिफारस केली होती. त्यावर गेली दहा वर्ष काहीच झालं नाही. तीन महिन्यापूर्वी आलेल्या सरकारने हा निर्णय घेतल्याने यामागे कोणतं राजकारण आहे असा कयास बांधला जाऊ लागला आहे.
राज्यात मुस्लिम बहुल 56 शहर आहेत. राज्यात मुस्लिम समुदायाची 10.6 टक्के लोकसंख्या आहे. 70 टक्के लोकसंख्या शहरात राहते. एक पंचमांश ग्रामीण भागात राहते. मुंबईत सर्वात जास्त म्हणजे 21.6 टक्के मुस्लिम लोकसंख्या ग्रेटर मुंबईमध्ये आहे. शासकीय सेवेत मुस्लिमांचे केवळ 11 टक्के प्रतिनिधित्व आहे. 70 टक्के लोक कुशल काम करतात. सरकारच्या निर्णयावर मुल्ला मौलवी, तरूण- तरूणी काय म्हणतात हेही एबीपी माझाच्या राज्यभरातला टीमने जाणून घेतले आहे.
नरेंद्र मोदी-अमित शहांच्या राजकारणाचा धार्मिक धृवीकरण हा स्थायीभाव आहे. 2014-2019 च्या निवडणूकीत याचा भाजपाला फायदा झाला आहे. उत्तरप्रदेश सारखे राज्य योगींनी पुन्हा जिंकले त्यामागे बहुसंख्य हिंदूची मते हे कारण आहे. परंतु नुपूर शर्मा प्रकरणानंतर आंतरराष्ट्रीय पातळींवर भाजपाला मोठा विरोध सहन करावा लागला. देशात सुध्दा वातावरण तंग आहे
हे ओळखूनच संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी 75 मिनिटे संघाच्या दिल्ली कार्यालयात माजी मुख्य निवडणूक आयुक्त एसवाय कुरेशी, नजीब जंग, आरएलडी नेते नजीब जंग, शाहू मशिदीचे मुख्य इमाम यांची भेट घेतली. दोन्ही धर्मात सतत संवाद व्हावा अशी व्यव्सथा केली जाणार आहे. हैदराबादच्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीत नरेंद्र मोदी यांनी मुस्लिमांशी स्नेह वाढवा, मुस्लिमांतल्या ओबीसींशी बोला असे सांगितले आहे.
राज्याच्या इतर भागात कुठे किती मुस्लिम?
मुस्लिमांची राज्यामध्ये कुठे किती लोकसंख्या- ठाणे 8.6 टक्के, औरंगाबाद 5.5 टक्के, नाशिक 5.1 टक्के, जळगाव 4.4 टक्के, नांदेड 3.8 टक्के, सोलापूर 3.7 टक्के, अमरावती 3.4 टक्के, नागपूर 2.9 टक्के, अकोला 2.9 टक्के, बुलढाणा 2.8 टक्के, , मुंबई 22 टक्के, ग्रेटर मुंबई 21.6 टक्के मुस्लिम आहेत. इतर जिल्ह्यात 21.75 टक्के लोकसंख्या मुस्लिमांची आहे.