Nirmala sitaraman Pune : भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala sitaraman) पुणे (Pune) आणि बारामती (Baramati) दौऱ्यावर आहेत. आगामी निवडणुकांसाठी बैठका आणि विविध योजना आखण्यासाठी त्याचा हा दौरा आहे. पुण्यात आल्यावर पहिल्याच दिवशी मराठीतून भाषण सुरु करत सगळ्या पुणेकारांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. सगळ्या पुणेकर बंधू भगिनींना माझा नमस्कार, तुम्ही सगळे कसे आहात?, असं म्हणत अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणाला त्यांनी सुरुवात केली. त्यावेळी सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. 


पुण्यातील सिम्बॉयसिस महाविद्यालयात व्यवस्था परिवर्तनाची वीस वर्षे या विषयावर त्यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतात कशाप्रकारे परिवर्तन केलं, याबाबत त्यांनी भाष्य केलं.


निर्मला सीतारामण या बारामतीचा दौरा करणार आहेत. ग्रामीण लोकांशी संवाद साधणार आहेत. बारामती, पुरंदर आणि शिरुर या भागातील लोकांसमोर त्या आपले विचार मांडणार आहेत. मात्र ग्रामीण भागातील जनतेला त्यांची भाषा सहजपणे समजेल, असा टोला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी लगावला होता. मात्र सीतारमण यांनी थेट मराठीतून भाषण सुरु करत त्यांनी सगळ्यांना धक्का दिला आहे. 


भारतात पद्म पुरस्काराला विशेष महत्व आहे. यापूर्वी हे पुरस्कार कोणालाही दिले जात होते. मात्र काही वर्षांपासून हा पुरस्कार उत्तम कामगिरी करणाऱ्यांना आणि महत्वाचं म्हणजे सर्वसामान्यांना दिले जात आहेत. देशातील जनतेचा विकासावर विश्वास आहे त्याचबरोबर मोदींवरही त्यांचा विश्वास आहे, असंही त्या म्हणाल्या. पंतप्रधान मोदींनी भारताला वेगळ्या उंचीवर नेले आहे. भारत भ्रष्टाचारमुक्त करण्यात त्याचा महत्वाचा वाटा आहे. काही वर्षांपूर्वी डिजीटल इंडियाचं धोरण आखलं होतं तेव्हा अनेक मंत्र्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. मात्र योग्य नियोजन करुन त्यांनी डिजीटल इंडियाचं धोरण पूर्ण केलं. त्यांच्यामुळे आता सगळं एका क्लिकवर उपलब्ध आहे, असंही म्हणत त्यांनी पंतप्रधानांचं कौतुक केलं. 


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी आणि विचार परिवार समन्वय यांच्यासोबत त्यांनी बैठक घेतली. ही बैठक धनकवडी येथील छत्रपती शिवराय मंगल कार्यालयात घेतली. आगामी निवडणुकीचं धोरणं आखण्यासाठी ही बैठक महत्वाची मानली जाते. यात शहरातील प्रमुख पदाधिकारी आणि काही स्वयंसेवक उपस्थित होते.


बारामती दौऱ्यादरम्यान जेजुरीचं दर्शन घेणार
उद्या सकाळी निर्मला सीतारमण जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिराला भेट देणार आहेत. देवस्थानच्या वतीने निर्मला सीतारमण यांच्या दौऱ्याची तयारी सुरु केली आहे. निर्मला सीतारमण या जेजुरी संस्थानच्या पदाधिकऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्यावेळी देवस्थानच्या वतीने निर्मला सीतारमण यांना निवेदन देण्यात येणार आहे. या निवेदनात जेजुरी गडाला पर्यटनाचा दर्जा मिळावा, वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळावा तसेच जेजुरी रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाड्या थांबवाव्यात, अशी मागणी जेजुरी संस्थानच्या वतीने अर्थमंत्र्यांना करण्यात येणार आहे.