मुंबई/उस्मानाबाद : विविधतेतून एकता असलेला आपला भारत देश. हिंदू मुस्लीम ऐक्याच्या अनेक घटना आणि अनेक प्रसंग आपल्या आजूबाजूला घडताना आपण पाहतो. मग एखादं संकट असो किंवा सणवार, विविधतेने नटलेल्या परंपरेचं दर्शन आपल्याला घडतच असतं. असाच एक प्रसंग गणेश चतुर्थीला उस्मानाबादमधील कळंब इथे घडला. एका चिमुकल्याच्या हट्टापायी एका मुस्लीमधर्मियांच्या घरात गणपती बाप्पा विराजमान झाले. अस्लम आणि अर्शिया जमादार या दाम्पत्याने आपल्या चिमुकल्याचा हट्ट पुरवला आणि घरात क्यूट बाप्पाची प्रतिष्ठापना आणि आरतीची झाली.


अस्लम शेख यांनी फेसबुक पोस्टद्वारे हा संपूर्ण प्रसंग कथन केला आहे. त्यांच्या तीन वर्षांच्या चिमुकल्याने अब्रारने अम्मीकडे गणपती आणायचा हट्ट धरला. अर्शिया यांनी ड्यूटीवर असलेल्या अस्लम जमादार यांना याबाबत सांगितलं. त्यानंतर काही वेळाने घरात बाप्पांचं आगमन झाल्याचा फोटोच अर्शिया यांनी अस्लम जमादार यांना पाठवला. घरात बाप्पा आल्याने अब्रार अतिशय खूश आहे.


मागच्या वर्षी अब्रार शेजाऱ्यांसोबत गणपती आणायला गेला होता. तेव्हापासूनच त्याला बाप्पाचा लळा लागला. परंतु शेजाऱ्यांची बदली झाल्याने यंदा अब्रारला गणपती आणायला जाता आलं आणि मग त्याने बाप्पाला घरीच आणण्याचा हट्ट धरला. विशेष म्हणजे जातीधर्माच्या भिंती मोडून अस्लम आणि अर्शिया जमादार या दाम्पत्याने लेकराचा हट्ट पुरवत गणपती घरी आणला विधीवत त्याची प्राणप्रतिष्ठा करुन आरतीही केली.



मागील वर्षी अब्रारने शेजाऱ्यांसोबत गणपती आणलेला फोटो

मूळचे कोल्हापूरचे असलेले अस्लम शेख हे नायब तहसीलदार आहेत. सध्या कळंब इथे त्यांची पोस्टिंग आहे. अस्लम जमादार यांची ही पोस्ट आतापर्यंत 150 जास्त वेळा शेअर झाली असून दीड हजारांपेक्षा जास्त जण त्यावर रिअॅक्ट झाले आहेत.


अस्लम शेख यांनी फेसबुकवर काय लिहिलंय?


"आज दुपारी ग्रामीण भागात कामानिमित्त गस्तीवर असताना बायकोचा फोन आला. माझा मुलगा अब्रार गणपती आणायचा म्हणून हट्ट करतोय आणि खूप रडतोय अस तिचा निरोप. आधी हसू आलं ऐकून. मुसलमानांच्या घरी गणपती हा विचार माझ्या डोक्यात... मागच्या वर्षी मी, रवी, बाबळे सर सोबत आमची चिमुकली मुले बाबळे सरांचा गणपती आणायला गेले होते. यावर्षी रवी आणि बाबळे सर बदलून गेले त्यामुळे गणपती आणायला गेलो नाही. पण त्या लहान लेकराला काय कळतंय मुसलमान काय आणि गणपती काय... लहानपण देगा देवा म्हणतात ते खरंच आहे. मी तिला म्हटलं त्याला सांग मी घरी आलो की आणू गणपती. वेळ मारून नेण्यासाठी तेवढंच काय ते कारणं. मग थोड्या वेळाने बायकोने व्हाट्सएप ला फोटोच पाठवला. श्रींची मूर्ती माझ्या घरी विराजमान झालेली. प्रस्थापित मानसिकतेमुळे जे शक्य होत नाही असं वाटत होतं ते प्रामाणिक निरागसतेनं केलं. संध्याकाळी सर्वांनी सोबत बाप्पाची आरती केली. जर त्याच्या मनात आलं तर बाप्पा मुसलमानांच्या घरी सुद्धा आनंदाने येतो आणि त्याला आणल्यावर आनंद पण सोबत येतो याची आज प्रचिती झाली. अब्रार खूप खुश आहे बाप्पासोबत. आता काय ते फक्त एकच मागणं आहे बाप्पाकडं. तुला स्वीकारायची निरागसता अशीच त्याच्या मनात आयुष्यभर राहूदे. बाप होऊन जेंव्हा विचार केला तेंव्हा मुलाचा आनंद आणि बाप्पाचं माझ्या घरात येणं दोन्ही ही खूप सहजपणे स्वीकारता आलं. आयुष्यात ही सहजता अशीच कायम राहूदे रे बाप्पा.
#गणपती_बाप्पा_मोरया


https://www.facebook.com/aslam.jamadar26/posts/10158409332668592