सांगलीत : सांगलीत मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झाली आहे. स्त्री-पुरुष, तरुण-तरुणी, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत, तसंच विद्यार्थ्यांनी लाखोंच्या संख्यने मोर्चात सहभाग नोंदवला आहे. सांगलीतल्या या मराठा मोर्चात हिंदू-मुस्लीम एकतेचं चित्र पाहायला मिळाली.

मुस्लीम बांधवांनीही या मराठा समाजाच्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. मुस्लीम बांधव या मोर्चात पाणीवाटपाचं महत्त्वाचं कार्य करत आहेत. राज्यातील यापूर्वीच्या मराठा क्रांती मोर्चांप्रमाणेच सांगलीच्या मोर्चातही मुस्लीम बांधव पाणीवाटप करताना दिसत आहेत.

यापूर्वी बहुतांश मराठा मोर्चात मुस्लीम बांधव पाणीवाटप करताना दिसत आहेत. आता सांगलीतही तेच चित्र पाहायला मिळाल.

मराठा मोर्चाला सुरुवात



दरम्यान, क्रांतिसिंह नाना पाटील चौकापासून या मोर्चाला सुरुवात झाली आहे. तिथून कर्मवीर भाऊराव पाटील पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

मोर्चासाठी चोख पोलिस बंदोबस्त

कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून 1800 पोलिस कर्मचारी, 750 होमगार्ड, एसआरपीएफच्या 4 तुकड्या, 9 विभागीय पोलिस अधिकारी, 5 पोलिस उपअधीक्षक, असा चोख बंदोबस्त सांगलीत तैनात केला आहे.

राजकीय नेतेही मोर्चात

आजच्या मूक मोर्चात पतंगराव कदम, विश्वजित कदम, जयंत पाटील, आर आर पाटील यांचे कुटुंबीय, सर्व आमदार आणि खासदार संजय पाटील हजेरी लावणार आहेत.