सोलापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा तारेवरची कसरत आहे. अशा परिस्थिती 'बी पॉझिटिव्ह, आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह' ही मोहीम राबवत जिल्ह्यातील सर्वात तरुण सरपंच ऋतुराज देशमुख यांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन गाव कोरोनामुक्त केलाय. मोहोळ तालुक्यातील घाटणे गावाने ही किमया साधली आहे.




कोरोनाच्या पहिल्या लाटेत वाचलेलं घाटणे गाव दुसऱ्या लाटेत मात्र सापडलं. मार्चपर्यंत एकाही कोरोना रुग्णाची नोंद गावात झाली नव्हती. मात्र, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गावात पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर रोजच रुग्ण आढळू लागले. अशा परिस्थितीमध्ये सरपंच ऋतुराज देशमुख यांनी ग्रामस्थांना एकत्र करत गावात 'बी पॉझिटिव्ह, आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह' ही मोहीम राबवली. गावकऱ्यांनीही यात सहभाग घेऊन सरपंचांना साथ दिली. परिणामी गावात कोरोना रुग्णसंख्येत घट होत गेली. सध्या गाव पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे.




कोरोनामुक्तीसाठी गावकऱ्यांना आवाहन
घाटणे गावचा एक सेवक म्हणून मला तुमच्या सहकार्याची गरज आहे. तुमच्या उत्तम आरोग्यासाठी आपले पूर्ण सहकार्य देऊन गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन ऋतुराज देशमुख यांनी ग्रामस्थांना केले. या मोहीमेअंतर्गत गाव कोरोनामुक्त करण्यासाठी रुग्णांचा शोध, तपासणी, उपचार, लसीकरण, नियमांचे काटेकोरपणे पालन या पंचसूत्रीच्या आधार घेण्यात आला.


उपाययोजना



  • प्रत्येक कुटुंबाला एक "कोरोना सेफ्टी किट' दिलंय. यात काही औषधे देण्यात आली आहेत.

  • प्रबोधन करुन गावातील 45 वर्षांवरील सर्व व्यक्तींना लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेतले.

  • शहरात ये-जा करणारी अथवा व्यवसाय असणाऱ्या सर्व लोकांच्या रॅपिड अँटिजेन टेस्ट केल्या.

  • आशा ताईंच्या माध्यमातून प्रत्येक आठवड्याला गावकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. यात ऑक्‍सिजन लेव्हल आणि तापमान चेक केले जाते.




गाव कोरोनामुक्त झालं असलं तरी लढाई अजून संपली नाही. गावात आता कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी काळजी घेत असल्याचे देशमुख यांनी सांगितले. सोबतच लवकरात लवकर गावातील सर्वांचे लसीकरण करुन घेणार असल्याचेही ते म्हणाले.



  • परगावातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सक्तीचे तीन दिवस क्वारंटाइन केले जाते.

  • गावात जिल्हाधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांच्या माध्यमातून क्वारंटाईन सेंटर सुरु करण्यात आले आहे.