वसई : तोक्ते चक्रीवादळाने अनेकांचं बरंच काही हिरावून घेतलं आहे. वसई-विरार परिसरात या वादळाचा फटका मोठ्या प्रमाणावर बसला आहे. फळबागा, शेती, मत्सप्रमाणे अनेकांच्या घरांचं देखील नुकसान झालं आहे. तर तिकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिकविणाऱ्या शिक्षिका यांनादेखील या वादळाचा फटका बसला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ज्या शिक्षिकेने घडवलं, राज ठाकरे यांना जीने  शिकवलं अशा शिक्षिका वसईतील एका वृद्धाश्रमात सध्या तुटलेल्या पत्राचा आधार घेऊन दिवस काढत आहेत.


सुमन लक्ष्मण रणदिवे (87 वर्ष) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचे बंधु राज ठाकरे यांच्यासहित मुंबई आणि आसपासच्या परिसरातील अनेक बड्या राजकीय नेत्यांना शिक्षणाचे धडे दिले आहेत. सुमन लक्ष्मण रणदिवे या दादरच्या शिवाजी पार्क येथील बालमोहन विद्यामंदिर शाळेत शिक्षिका होत्या. मात्र पतीच्या मृत्यूनंतर तसेच मुलगाही नियतीने हिरावून घेतल्याने सध्या त्या वसईतील सत्पाळा गावातील “न्यू लाईफ केअर” या वृद्धाश्रमात वास्तव करत आहेत.


सोमवारी आलेल्या तोक्ते चक्रीवादळात या वृद्धाश्रमाचे सर्व पत्रे उडाले आहेत. सुमन यांच्यासारखे तब्बल 29 वृद्ध येथे राहतात. अचानक वादळ आले, त्यामुळे त्यांना काहीही हालचाल करायला वेळ देखील मिळाला नाही. सर्व वयोवृद्ध नागरिकांचे कपडे, जवळील सामान, बिछाने, त्यांची कागदपत्र सर्व या पावसात भिजलं आहे. सर्व पत्रे तुटल्याने थेट उंच आकाशाकडे पाहत त्यांना दिवस काढावे लागत आहेत. वादळ थांबून नऊ दिवस झाले आहे, मात्र या आश्रमात अद्याप पत्रे लागले नाहीत. जवळपास आठ ते दहा लाखांचे नुकसान झाल्याचं आश्रमाच्या संचालकांनी सांगितलं आहे.


चक्रिवादळाने झालेल्या नुकसानीमुळे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मेसेजही केला आहे. “उद्धव बेटा, मला तुला भेटायच आहे. तू शिवाजी पार्कमध्ये शाळेत असताना मी तुला शिकवत होते. इथली परिस्थिती खुप खराब झाली आहे. कृपया आम्हाला मदत कर..” 1991 साली रणदिवे टिचर निवृत्त झाल्या. त्यानंतर 2014 साली त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यामुळे आता हे वृद्धाश्रमच रणदिवे यांच्यासोबतच इतर अनेक वृद्ध नागरिकांचं आश्रयस्थान आहे.


आयुष्यातील शेवटच्या घटकेला यातना कमी व्हाव्यात म्हणून आधारासाठी वृद्धाश्रमात आले आहेत. मात्र इथे देखील त्यांच्या यातना कमी होताना दिसून येत नाहीत. त्यांना आर्थिक मदत नको मात्र वस्तू, सामानाची मदत केली तरी हे आश्रम उभारी घेण्यासाठी पुन्हा तयार होईल. त्यामुळे आशा आहे की या आश्रमासाठी लवकर मदत मिळेल.