सोलापूर : सोलापुरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाली काम करणाऱ्या सलीम राज अहमद शेख याचा मंगळवारी संध्याकाळी मृतदेह सापडला होता. मात्र हे खून अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी अवघ्या तीन तासात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत अटक केली आहे. सोलापुरातील शेळगी परिसरात राहणाऱ्या सलीम राजअहमद शेख याचा दहिटणे परिसरात मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात मृत सलीमच्या आईने जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. मृताच्या आईने दिलेल्या माहितीवरुन परिसरातच राहणाऱ्या नबीलाल शेख याला पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. 


मृत सलीमच्या बायकोचे आणि आरोपी नबीलाल शेख याचे अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधाची माहिती मृत सलीमच्या आईला झाली. मात्र असे वागू नको म्हणत त्यांनी आपल्या सुनेची समजूत काढण्याचा प्रयत्न देखील केला. खून झाल्याच्या दिवशी सलीम आणि त्याची पत्नी दोघेही कृषी उत्पन्न बाजार समितीत हमालीसाठी गेले होते. साधारण दुपारी चार वाजता आरोपी नबीलाल सलीम याच्या घरी आला. सलीम याला घेऊन दहिटणे परिसरातील घोडेपीर दर्ग्याजवळ नेले. तेथे आरोपी नबीलाल आणि मृत सलीम या दोघांनीही दारू आणि गांजाची नशा देखील केली. 


त्यानंतर मयत सलीम याने आरोपीस तू माझ्या बायकोसोबत का बोलतो या कारणावरुन भांडण काढले. याच भांडणात आरोपी नबीलाल याने दगडाने डोक्यात हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सलीमला पाहून त्याने तिथून पळ काढला. संध्याकाळी 6.30 च्या सुमारास परिसरातील नागरिकांनी पोलिसांना मृतदेह आढळल्याचे कळवले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन त्याची ओळख पटवत गुन्हा दाखल केल्यानंतर अवघ्या तीन तासात आरोपी नबीलाल यास अटक केली. आरोपी नबीलाल याला न्यायलयात हजर केले असता त्याला 15 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत आणखी तपास सुरु असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी दिली.