मुंबई: प्रेमप्रकरणातून मुलाची किंवा मुलीची हत्या झाल्याचे अनेक प्रकार यापूर्वी घडले आहेत. मात्र मुलीच्या वडिलांने मुलाच्या वडिलांची हत्या केल्याचा प्रकार वसईत घडला आहे.
काय आहे प्रकरण?
वाकोल्यात राहणाऱ्या महेंद्र सिंह यांच्या मुलाचं एका मुलीवर प्रेम होतं. महेंद्र सिंह हे मूळचे बिहारचे. त्यांच्या मुलाचं बिहारमध्ये सिंह यांच्या परिसरातच राहणाऱ्या मुलीवर प्रेम होतं. या प्रेमप्रकरणातून मुलगी आणि सिंह यांचा मुलगा दोघेही विरारला पळून आले होते.
मात्र मुलगी पळून गेल्याचं कळताच, तिच्या वडिलांनी थेट मुंबई गाठून महेंद्र सिंह यांच्या घराकडे धाव घेतली. महेंद्र सिंह यांच्याकडे त्यांनी जाब विचारुन, मुलगी कुठे आहे याबाबत विचारणा केली. मात्र तिचा पत्ता न सांगितल्याने चिडलेल्या मुलीच्या वडिलाने महेंद्र सिंह यांना काहीतरी बहाणा करुन चिंचोटी परिसरात नेलं. तिथे त्यांची धारदार शस्त्राने हत्या केली. हा सर्व थरार 26 एप्रिलला घडला होता.
गोणीत बांधलेला मृतदेह
दोन्ही कुटुंब बिहारमधील एकाच गावचे आहेत. मात्र मुलीच्या प्रेमप्रकरणामुळे चिडलेल्या बापाने मुलाच्या बापाची हत्या केली. त्यानंतर मृतदेह सुतळी गोणीत बांधून फेकून आरोपी फरार झाला होता.
कोणताही पुरावा मृतदेहाजवळ नसताना वालिव पोलिसांनी मोठ्या शिताफीने हत्येचा उलगडा करुन आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. त्यांचे अन्य कोण साथीदार आहेत का, याचा आता पोलीस शोध घेत आहेत.