भिवंडी : जमिनीच्या वादातून शेजाऱ्याने युवकाची भररस्त्यात धारधार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक समोर आली आहे. भिवंडीतील गैबीनगर येथील ही घडली आहे. या हल्ल्यात युवकाचा जागीच त्याचा मृत्यू झाला. मोहम्मद आवेश सईद अहमद अन्सारी असं 32 वर्षीय मृत तरुणाचं नाव असून तो शांतीनगर पिराणीपाडा येथील रहिवासी होता.
रविवारी घरी पाहुणे येणार असल्याने आवेश पत्नीसह दुचाकीवर बाजारात निघाला होता. त्यावेळी शेजारी राहणारा अफरोज आणि त्याचे साथीदार रिक्षाने आवेशचा पाठलाग करत होते. काही अंतरावर पाठलाग करणाऱ्या रिक्षाने आवेशच्या बाईकला धडक दिली. धडकेनंतर आवेश आणि त्याची पत्नी कुलसुम उर्फ जोया खाली पडले. त्यावेळी अफरोज अन्सारी व त्याच्या साथीदारांनी आवेशच्या पत्नीसमोरच त्याच्यावर चॉपरने सपासप 7 ते 8 वार केले.
या हल्ल्यात आवेशचा जागीच मृत्यू झाला. काही क्षणात घटनेची माहिती संपूर्ण परिसरात पसरली. त्यानंतर नागरिकांना अफरोज घरावर हल्लाबोल करत घराचं मोठं नुकसान केलं. काही वेळाने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी अफरोज अन्सारीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
गेल्या 30 वर्षपासून मयत आवेश अन्सारीचा त्याच्या शेजारी राहणाऱ्या हसीना आणि अफरोज यांच्याशी जमिनीवरुन वाद सुरु होता. कोर्टाने आवेश अन्सारीच्या बाजूने निकालही दिला होता, मात्र त्याच्या शेजाऱ्यांना ही गोष्ट मान्य नव्हती. त्यामुळे दोन्ही कुटुंबामध्ये नेहमी भांडण होत असे. अफरोज आवेशच्या जमिनीवर हक्क दाखवत होता आणि त्याला त्याठिकाणी घर बांधायचे होते. घर बांधण्यास त्याने सुरुवातही केली होती.
काही दिवसांपूर्वी याच कारणावरून आवेशला घरात घुसून मारहाण करून धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी आवेश आणि त्याच्या पत्नीने शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आवेशच्या कुटुंबियांनी केला आहे.