धुळे : भाजपचे आमदार अनिल गोटे धुळ्याच्या महापौरपदाची निवडणूक लढवणार आहेत. धुळ्यातील शिवतीर्थ चौकातील जाहीर सभेत स्वत: गोटे यांनी याबाबतची घोषणा केली. आपल्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनिल गोटेंनी स्वतःला धुळे महापौरपदाच्या रिंगणात उतरवलं आहे. मात्र आमदारपदाचा राजीनामा देऊन महापौरपदाची निवडणूक लढवणार का ? या प्रश्नावर आमदार गोटे यांनी बोलण्याचं टाळलं.


धुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या भाजपच्या पहिल्याच जाहीर सभेत धुळे भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली होती. बॅनरवरुन शहराचे आमदार अनिल गोटेंचाच फोटो गायब होता. याचाच जाब विचारण्यासाठी आमदार गोटे समर्थकांना घेऊन सभास्थळी पोहोचले. खरंतर गोटेंना माझा फोटो का वगळला, याचा जाब भरसभेत विचारायचा होता. मात्र आधी दानवे आणि त्यानंतर गिरीश महाजनांनी त्यांना रोखलं. मात्र त्यामुळे कार्यकर्ते चवताळले आणि त्यांनी थेट खुर्च्यांचीच मोडतोड सुरु केली.

यानंतर शिवतीर्थ चौकातील आमदार अनिल गोटे यांच्या सभास्थळी लावलेल्या बॅनरवर संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, तसंच रोहयो, पर्यटन मंत्री जयकुमार रावल या तिघांच्या फोटोला स्थान नव्हते. या सभेत आमदार अनिल गोटे यांनी मोदींच्या नोटाबंदी निर्णयाबाबत परखड मत मांडत भाजपला घरचा आहेर दिला.

दरम्यान, भाषण सुरु असताना प्रकृती आमदार अनिल गोटे यांची खालावल्याने दहा मिनिटं सभा थांबण्यात आली होती.