अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारलं आहे. त्यामुळे पालिकेचं कामकाज चार दिवसांपासून ठप्प झालं आहे. तीन महिन्याचं थकीत वेतन न दिल्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरु केलं आहे.
पालिका कर्मचाऱ्यासोबतच निवृत्त कर्मचाऱ्यांनीही आपली पेन्शन मिळावी या मागणीसाठी आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. साडे पंधरा कोटींची देणी थकल्यानं कायम आणि मानधनावरील तीन हजार आणि सेवानिवृत्त अडीच हजार कामगारांचं चार दिवसापासून आंदोलन सुरु आहे.
गेल्या चार दिवसापासून पालिकेचे कामकाज ठप्प झालं आहे. स्वच्छता, आरोग्य आणि सफाई कामगारांनी बंदमध्ये सहभाग घेतल्यानं पालिकेचीही गोची झाली आहे. दोन दिवसात निर्णय न झाल्यास कुटुंबियांसह मोर्चा काढण्याचा इशारा अहमदनगर महानगर पालिका कामगार युनीयनने दिला आहे.