छगन भुजबळ आणि शिवसेना नेत्यांनी एकाच कंपन्यांमधून मनी लाँडरिंग केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. त्यात कंपन्यांची नावंही जाहीर केली होती. तसंच हे आरोप करताना थेटपणे उद्धव ठाकरेंचं नाव घेणं टाळून त्यांच्या चार्टर्ड अकाऊंटंट आणि इतर नेत्यांचा उल्लेख केला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेली चौकशीची घोषणा कुणापर्यंत जाणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
"सोमय्यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. त्यांनी काही कागदपत्र सादर केले आहेत. या कंपन्यांमध्ये मनी लाँडरिंग झालं आहे. त्यांनी उद्धवजींना हे विचारलं की याच्याशी शिवसेनेच्या काही नेत्यांशी संबंध आहे का? असतील तर कोण आहेत? त्यांच्यावर कारवाई करणार आहात का? यानंतर मी सोमय्यांना सांगितलं, की याचा राजकीय उपयोग करु नका. तुम्ही संबंधित विभागाला ही कागदपत्रं सोपवा. संबंधित यंत्रणा त्याच्यावर कारवाई करेल" असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तसंच जर मनी लाँडरिंग झालं असेल तर चौकशी तर होणारच, असं मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं.
काय आहे किरीट सोमय्यांचा आरोप?
मनी लाँडरिंगप्रकरणी जेलमध्ये असेलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एकाच कंपन्यांमधून मनी लाँडरिंग केल्याचा गंभीर आरोप भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.
‘उद्धव ठाकरे स्वत:ची संपत्ती का जाहीर करत नाही? त्यांना एवढी कसली भीती वाटते?’ असं म्हणत सोमय्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
याआधी किरीट सोमय्यांनी सात कंपन्यांची यादी जाहीर केली होती. या कंपन्यांशी शिवसेना नेत्याचे लागेबांधे असल्याचा आरोप केला होता.
संबंधित बातम्या
भुजबळ आणि शिवसेना नेत्यांचं एकाच कंपनीत मनी लाँडरिंग: सोमय्या
उद्धव ठाकरेंचे सात कंपन्यांशी आर्थिक लागेबांधे, सोमय्यांचा आरोप
सोमय्यांनी आधी अमित शाहांची संपत्ती जाहीर करावी: राहुल शेवाळे
उद्धव ठाकरेंनी संपूर्ण कुटुंबाच्या संपत्तीचं ऑडिट करावं: सोमय्या