नागपूर : नगरपरिषदांच्या चौथ्या आणि अंतिम टप्प्यातील निवडणुका आज होणार असून त्यात नागपूरच्या 9 तर गोंदियातल्या 2 नगरपरिषदांचा समावेश आहे.
निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या नगरपरिषदांमध्ये केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींचं होमग्राऊंड असलेल्या कळमेश्वर आणि मोहपाचाही समावेश आहे. सध्या कळमेश्वर आणि मोहपामध्ये भाजपचीच सत्ता आहे आणि ही सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपने सर्व शक्ती पणाला लावली आहे.
तर भाजपला कडवं आव्हान देण्यासाठी नागपूर जिल्ह्यातले काँग्रेसचे एकमेव आमदार सुनील केदार हे कळमेश्वरमध्ये तळ ठोकून आहेत.
यापूर्वी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले आहेत. यामध्ये भाजपने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आता शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जिल्ह्यात भाजपच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
तिसऱ्या टप्प्यातील 19 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतींच्या निकालात भाजपला चांगलं यश मिळालं. तर काँग्रसेनंही आपला गड राखण्याची किमया केली. 19 नगरपालिकांपैकी काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी आठ नगरपालिकांमध्ये यश मिळालं. तर राष्ट्रवादीला अवघ्या एका जागेवर झेंडा फडकवता आला.
शिवसेनेला मात्र मराठवाड्यात खातंही उघडता आलं नाही. असं असलं तरी शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या मात्र वाढली आहे. नांदेडच्या मुदखेडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांना, तर भंडाराच्या तुमसरचा निकालही राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल यांना धक्का देणारा लागला.