औरंगाबाद : मुंबई पोलिस दलातील एका महिला पोलिस अधिकाऱ्यासोबत (Mumbai Police Women Officer) प्रेमाचे नाटक करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्याला अटक करण्यात आलं आहे. संदीप ठाकूर असं आरोपीचं नाव आहे. संदीपनं संबंधित महिला अधिकाऱ्यावर अत्याचार करून त्याचे चित्रीकरणही केले. नंतर ते व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करत होता, अशी माहिती आहे. औरंगाबादमधून हे खळबळजनक प्रकरण उघडकीस आलं आहे. 


मुंबई पोलीस दलात सहाय्यक निरीक्षकपदी कार्यरत असलेल्या एका महिलेने आपल्या पतीसोबत झालेल्या वादानंतर घटस्फोट घेतला होता. त्यानंतर लग्न जुळवून देणाऱ्या एका संकेतस्थळावर तिने नोंदणी केली. या संकेतस्थळावर नोंदणीनंतर सदरील महिलेची औरंगाबादेतील संदीप ठाकूरसोबत परिचय झाला. संदीप ठाकूरनं त्या महिला पोलिस अधिकाऱ्याला आपण एका बँकेत अधिकारी असल्याचं सांगत तिच्याशी ओळख वाढवली. आपलंही आपल्या पत्नीसोबत पटत नाही त्यामुळे आपणही दुसरं लग्न करणार असल्याची माहिती महिलेला दिली. 


संदीपने ओळख वाढवत सदरील महिलेचा मोबाईल नंबर मिळवला नंतर तिची मुंबईमध्ये भेटही घेतली. ओळख वाढल्यानंतर शीतपेयात गुंगीचे औषध देऊन तिच्यावर एके ठिकाणी अत्याचार केल्याचं महिला अधिकाऱ्यानं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.


काही दिवसानंतर संदीप ठाकूर याची पत्नी पुन्हा त्याच्या सोबत राहायला आली. त्यानंतर सहाय्यक निरीक्षक असलेल्या या महिलेचे नौदलातील एका जवानांसबत लग्न ठरले होते. ही बाब संदीप ठाकूरला सातत्यानं खटकत होती.  त्याने सदरील महिलेचे ज्याच्या सोबत लग्न ठरलं आहे. त्याच्या मोबाईलवर अत्याचार केलेले चित्रीकरण पाठवले. संदीपच्या या कृतीमुळं सदरील अधिकारी महिलेचे लग्न मोडले.


त्यानंतर या व्हिडीओचा गैरफायदा घेत कोटला कॉलनीतच राहणाऱ्या एका वकिलासह अन्य एकाने तिला ब्लॅकमेल करणं सुरू केलं. या ब्लॅकमेलिंगला कंटाळलेल्या महिलेने 12 जून रोजी पवई पोलिस ठाण्यात या विरोधात तक्रार दिली आहे. तक्रारीनंतर पवई पोलिसांचं एक पथक पहाटे शहरात दाखल झाले त्यांनी सापळा रचून आरोपी संदीपला श्रद्धा कॉलनीतून ताब्यात घेतलं आहे.