Mumbai: निधीचा तुटवडा निर्माण झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळीत दिवाळी रक्कम मिळाली नाही. पीएफ, ग्रॅच्यूटीसारखी कित्येक देणी थकलेली असताना सरकारकडून प्रवासी करवसूली होत आहे. दिवाळीत कर्मचाऱ्यांची देणी थकलेली असतानाही सरकारने कर प्रवाशी कराची वसूली करत एसटी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
एसटीकडून प्रवाशाना दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या सवलतीची सरकार कडून मिळणारी रक्कम म्हणजेच सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कमेतून प्रवाशी कराची,समायोजन या गोंडस नावाखाली वसुली करणे हे निंदनीय असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
एसटी मंडळाकडून प्रवासी करवसूली सुरुच!
एसटी महामंडळाकडून राज्य सरकार १७.५ टक्के इतका प्रवाशी कर वसूल करीत असून त्यातील १० टक्के इतकी रक्कम राज्य सरकार कडून भांडवली अंशदान म्हणून एसटीकडे गुंतवणूक केली जात आहे .व उरलेली साडे सात टक्के इतकी रक्कम सरकारकडून प्रत्यक्ष वसूल केली जात आहे. ही साडे सात टक्के रक्कम सरकार सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम एसटीला देताना त्या रक्कमेतून कपात करून सरकार वसूल करीत आहे. ही रक्कम साधारणतः महिन्याला सुमारे ३५ कोटी रुपये इतकी होत असून त्यातील ८२ कोटी ३४ लाख रुपये इतकी रक्कम कालच समायोजन या गोंडस नावाखाली राज्य सरकारने वसूल केली आहे.ही रक्कम कधी वसूल करावी याचे राज्य सरकारला भान राहिलेले नाही. असे बरगे यांनी म्हटलंय.
निवडणूकीनंतर जाब विचारू
ही वसुली करतांना एसटीला खर्चाला कमी पडणाऱ्या पैशाचा विचार केलेला नाही.पी.एफ., ग्र्याजुटी, बँका, ग्राहक सोसायटी, क्रेडिट सोसायटी, एसटी सामान पुरविणाऱ्या कंपन्या यांच्या साधारण ४००० कोटी रुपयांच्या रकमा एसटीकडून थकल्या असताना एसटीला पैशाची गरज असताना अशा वेळी प्रवाशी कर रक्कम वसूल करणे हे नादान पणाचे लक्षण असून ही वसुली करणाऱ्या नादान अधिकाऱ्यांना निवडणुकीनंतर जाब विचारला जाईल असेही बरगे यांनी म्हंटले आहे.