राज्यातील हॉटेल, दुकानं आता 24 तास सुरु राहणार!
एबीपी माझा वेब टीम | 11 Aug 2017 11:40 AM (IST)
राज्यभरातील दुकानं, मॉल्स, रेस्टॉरंट रात्रभर सुरु ठेवण्यासाठी, दुकानं आणि आस्थापना कायद्यात बदल करण्यासंबंधीचं विधेयक विधानसभेत बुधवारी मध्यरात्री मंजूर करण्यात आलं.
मुंबई : आता तुम्ही 24 तासात कधीही खाऊ, पिऊ आणि खरेदीही करु शकणार आहात. कारण राज्यभरातील हॉटेल, मॉल आणि दुकानं रात्रभर सुरु राहणार आहेत. राज्यभरातील दुकानं, मॉल्स, रेस्टॉरंट रात्रभर सुरु ठेवण्यासाठी, दुकानं आणि आस्थापना कायद्यात बदल करण्यासंबंधीचं विधेयक विधानसभेत बुधवारी मध्यरात्री मंजूर करण्यात आलं. त्यामुळे आता रात्रभर खाण्यापिण्याची, शॉपिंगची चंगळ तुम्हाला अनुभवता येणार आहे. मात्र या निर्णयाने मुंबईत नाईट लाईफ बिनबोभाट सुरु होईल, असा विचार करत असाल तर तो चुकीचा आहे. दुकानं, हॉटेल सुरु ठेवण्याबाबत सरकारने काही बंधनं घातली आहेत. कोणत्या भागात कोणती दुकानं, आस्थापनं किती वेळ सुरु ठेवायची याचा अधिकार पोलिसांना देण्यात आला आहे. त्यासाठी पोलिसांकडून परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे. शिवाय जी दुकानं तसंच आस्थापनांमध्ये 50 पेक्षा अधिक महिला काम करतात, तिथे पाळणाघराची व्यवस्था मालकांना करावी लागणार आहे. तर शंभरहून अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी कॅन्टिनची व्यवस्था करणं बंधनकारक असेल. तसंच महिला कर्मचाऱ्यांना रात्रीच्या वेळी घरी सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी आस्थापना मालकांची असेल. तर प्रत्येक आस्थापनेत सीसीटीव्ही लावणं सक्तीचं केलं आहे. सध्याचा नियम - दुकाने, आस्थापना रात्री दहापर्यंत बंद करावी लागतात. पण त्यांना 15 मिनिटांची वाढीव वेळ असते. - हॉटेल-रेस्टॉरंट रात्री 12.30 वाजत बंद करावी लागतात. - वाढवी वेळ हवी असल्यास पोलिसांची परवानगी घ्यावी लागते. पानटपऱ्या रात्री अकरा वाजता बंद कराव्या लागता. - व्यावसायिक प्रतिष्ठानं रात्री साडेनऊला बंद करावी लागतात.