नागपूर : सध्या नागपूर मेट्रोचं काम मोठ्या जलदगतीनं सुरू आहे. पण नागपूर मेट्रोचं काम वेगानं पूर्ण करताना, मेट्रो प्राधिकरणाला तब्बल 800 कोटींची बचत करण्यातही यश आलं आहे. त्यामुळे या यशात गडकरी इफेक्ट तर नाही ना? अशी चर्चा सध्या नागपुरात सुरू आहे.
पुढच्या आठवड्यात नागपूर मेट्रोची चाचणी होणार आहे. त्यामुळे मेट्रोनं प्रवास करण्यासाठी राज्याची उपराजधानी सज्ज झालीय. विशेष म्हणजे, कामाच्या वेगामुळं, आणि योग्य नियोजनामुळं नागपूर मेट्रो प्रकल्पाची किंमत तब्बल 800 कोटींनी कमी झाली आहे. यात डीपीआर म्हणजेच, डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्टनुसार नागपूर मेट्रोचा खर्च 8 हजार 660 कोटी इतका होता. त्यात 10 टक्क्यांची बचत करण्यात अधिकाऱ्यांना यश आलं आहे.
वास्तविक, देशातल्या इतर मेट्रोच्या निर्मितीसाठी प्रति किलोमीटरमागे 200 ते 250 कोटी खर्च येतो. मात्र नागपूर मेट्रोसाठी हाच खर्च फक्त 170 ते 180 कोटींच्या घरात येणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च कमी करण्यासाठी नागपूर मेट्रोनं लढवलेली शक्कल खरचं कौतुकास्पद आहे.
बचतीसाठी करण्यात आलेल्या उपाय योजना
नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं बनवण्यात आलेल्या मेट्रोच्या डब्यांच्या देखभालीवर आणि धुलाईवर कमी खर्च होणार आहे. शिवाय दोन टोकांवरुन विद्युतपुरवठा करण्याऐवजी, नागपूर मेट्रोला मध्यातून विद्युत पुरवठा करण्यात येतोय. तर 6 कोचऐवजी 3 कोच असल्यामुळं स्टेशनच्या निर्मितीवरही कमी खर्च येतो आहे. तसंच, अधिग्रहण करण्यात येणारी जमीन शासकीय असल्यामुळं फक्त 60 कोटी मोजावे लागणार आहेत.
दरम्यान, देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे, या दोन्ही शहरांमधल्या मेट्रोवर मोठा खर्च होत आहे. त्यातच या दोन्ही शहरांमधील मेट्रो प्रकल्पाचं काम देखील चांगलच रखडलंय. त्यामुळं मुंबई आणि पुणे मेट्रोनं नागपूर मेट्रोकडून नियोजनाचे धडे शिकायला काहीच हरकत नाही.
नागपूर मेट्रोच्या निर्मितीचा 'जलद' आणि 'स्वस्त' प्रवास
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Aug 2017 11:27 PM (IST)
सध्या नागपूर मेट्रोचं काम मोठ्या जलदगतीनं सुरू आहे. पण नागपूर मेट्रोचं काम वेगानं पूर्ण करताना, मेट्रो प्राधिकरणाला तब्बल 800 कोटींची बचत करण्यातही यश आलं आहे. त्यामुळे या यशात गडकरी इफेक्ट तर नाही ना? अशी चर्चा सध्या नागपुरात सुरू आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -