Sachin Waze : सचिन वाझेचा यांचा जामीन अर्ज शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयानं फेटाळून लावला. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मनी लाँण्ड्रिग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) वाझेचीही चौकशी केली होती. त्याच मनी लाँण्ड्रिग प्रकरणात जामीन देण्यात यावा, अशी मागणी करणारा अर्ज वाझेकडून विशेष पीएमएलए न्यायालयात दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात ईडीकडून तपास पूर्ण झाला असून आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात आपल्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही त्यामुळे आपल्याला जामीन देण्यात यावा, अशी मागणी वाझेच्यावतीनं याचिकेतून करण्यात आली होती. न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर यावर सुनावणी पार पडली.
ईडीच्यावतीनं वाझेच्या अर्जाला तीव्र विरोध करण्यात आला. माजी गृहमंत्री देशमुखांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात वाझेचाही तेवढाच सहभाग होता. तोच संपूर्ण कटाचा मुख्य सुत्रधार आहे. जामीन मिळाल्यास तो फरार होण्याची शक्यता आहे. तसेच वाझे हा प्रभावशाली व्यक्ती असून जामीनावर सोडल्यास आपल्या आर्थिक सामर्थ्यावर तो तपासाची दिशा बदलून तो साक्षीदारांवरही प्रभाव टाकू शकतो. असा दावाही ईडीच्यावतीने अँड. सुनील गोन्साल्विस यांनी केला होता. तसेच देशमुखांच्या निर्देशानुसारच वाझेनं मुंबईतील विविध बार मालकांसोबत बैठक घेत असे आणि त्यांचा बार सुरळीत सूरू ठेवण्यासाठी दरमहा 3 लाख रुपये हफ्ता देण्यासही सांगितल्याचा दावा गोन्साल्विस यांनी केला. न्यायालयाने ईडीची बाजू ग्राह्य धरत वाझेचा जामीन अर्ज फेटाळून लावत त्याला दिलासा देण्यास नकार दिला.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अचानक मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील मानेंला एनआयएकडून प्रथम अटक करण्यात आली होती.
आणखी बातम्या :