मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यसभेच्या निवडणुका जूनमध्ये होणार आहेत. शिवसेनेनं देखील हालचाली सुरु केल्या आहेत. राज्यसभेसाठी संजय राऊत हे 26 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाराष्ट्रातून राज्यसभेवर सलग चौथ्यांदा जाण्याचा नवा विक्रम राऊत प्रस्थापित करणार आहेत.
महापालिका निवडणुकीआधी राज्यसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यातील बदललेल्या राजकीय स्थितीनुसार भाजपचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी होईल. तर, सहाव्या जागेसाठी आवश्यक असणारे संख्याबळ राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडे आहे त्यात शिवसेनेनं आधीच सहाव्या जागेवर दावा केला आहे. पहिल्या जागेसाठी तर शिवसेनेने संजय राऊत यांचे नाव निश्चित केले आहे. आता दुसऱ्या उमेदवाराचा शोध सुरू आहे पण पहिला उमेदवार म्हणून राऊत यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.
राज्यसभेतून भाजपचे पीयूष गोयल, विनय सहस्रबुद्धे आणि विकास महात्मे तर शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल आणि काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम असे महाराष्ट्रातील सहा राज्यसभा सदस्य 4 जुलै रोजी निवृत्त होत आहेत. या रिक्त जागांसाठी ही निवडणूक आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून चार माजी खासदाराची नावं चर्चेत आहे. चंद्रकांत खैरे, शिवाजी आढळराव पाटील, अनंत गीते आणि आनंदराव अडसूळ यांच्यापैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. हे चारही नेते गेल्या लोकसभेत पराभूत झाले आहेत, त्यामुळं एकाला राज्यसभेवर संधी देण्याचा शिवसेनेचा विचार आहे.
संबंधित बातम्या :