मुंबई : टीआरपी घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या 'फक्त मराठी' या वाहिनीचे मालक शिरीष पट्टणशेट्टी यांना गुरूवारी मुंबई सत्र न्यायालयाने 50 हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. आपल्या वाहिनीचा टीआरपी वाढविण्यासाठी बेकायदेशीरपणे पैसे दिले असा आरोप ठेवत मुंबई पोलिसांनी गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. शेट्टी यांनी अॅड. अनिकेत निकम यांच्यामार्फत जामीनासाठी अर्ज केला होता. गुरुवारी यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.आर. सित्रे यांच्यापुढे सुनावणी झाली.
'फक्त मराठी' या चॅनलचा टीआरपी कधीही आकस्मिक पद्धतीने वाढलेला नाही, आणि चॅनलच्या उत्पन्नातदेखील वाढ झालेली नाही, असा युक्तिवाद निकम यांनी कोर्टात केला. तसेच मुंबई पोलिसांनी केलेले आरोप हे तथ्यहीन आहेत व फक्त मराठी चॅनलने टीआरपी वाढवण्याकरता पैसे दिले यासंदर्भातला ठोस पुरावादेखील पोलिसांना दाखल करता आलेला नाही, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे फक्त मराठी या एकाच चॅनलला यामध्ये विनाकारण गोवले आहे, असाही युक्तिवाद त्यांना कोर्टात केला. हा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने शेट्टी यांना जामीन मंजूर केला. तसेच जामीनासोबत अन्य एक हमीदार दाखल करणे, तपासाला सहकार्य करणे, साक्षी पुरावे प्रभावित न करणे अशा अटींवर न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे.
विशिष्ट घरांमध्ये पैसे देऊन बोगसपणे या आरोपींनी टीआरपी वाढवून जाहिरातींचा लाभ घेतला, असा आरोप घेत मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. बार्क म्हणजेच ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलने यासंबंधी तक्रार केली आहे. याबाबत अन्य काही चॅनलची चौकशी सुरू असून पोलिसांनी याप्रकरणी अकरा जणांना अटकही केली आहे.
संबंधित बातम्या :