Mumbai Session Court on Chhagan Bhujbal : महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून आपल्या वक्तव्यांनी आणि रोखठोक भूमिकेने नाराजी ओढवून घेतलेल्या आणि नाशिक लोकसभेला इच्छूक असूनही संधी न मिळाल्याने स्वत: नाराज असलेल्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Session Court on Chhagan Bhujbal) झटका दिला आहे. कलिना भूखंड गैरव्यवहार प्रकरणामध्ये छगन भुजबळ यांना मुंबई सत्र न्यायालयाने तंबी देताना पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सुनावणीला गैरहजर राहिल्यास वॉरंट बजावण्याचा इशाराही सत्र न्यायालयाकडून देण्यात आला आहे. 


भुजबळ यांना पुढील सुनावणीला हजर राहावे लागणार


न्यायालयाने इशारा देताना सांगितले की, तुम्ही अनेकदा तारखांना गैरहजर राहिला आहात. पुढील सुनावणीसाठी हजर राहा, अन्यथा वॉरंट बजावलं जाईल, असा तोंडी इशारा देत न्यायालयाने भुजबळ यांचा सुनावणी पुढे ढकलण्याचा अर्ज फेटाळून लावला. तसेच पुढील सुनावणीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. या प्रकरणी आता 28 जून रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या निर्देशांमुळे छगन भुजबळ यांना पुढील सुनावणीमध्ये न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. 


सुनावणी पुढे ढकलण्यासाठी छगन भुजबळ यांच्याकडून अर्ज


कलीनामधील राज्य मध्यवर्ती ग्रंथालय उभारण्याच्या गैरव्यवहार प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या प्रकरणी सुनावणी पुढे ढकलण्यासाठी छगन भुजबळ यांच्याकडून अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे. हे प्रकरण छगन भुजबळ राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते तेव्हाच्या कालखंडातील आहे. 


भुजबळ यांच्यासह सहा जणांवर आरोपपत्र दाखल


राज्य मध्यवर्ती ग्रंथालय उभारणीच्या कंत्राटामध्ये गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं आहे. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) भुजबळ यांच्यासह सहा जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या खटल्याची मुंबई सत्र न्यायालयाचे विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे.


इतर महत्वाच्या बातम्या