रत्नागिरी : लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात आता ऑरेंज झोनमध्ये असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याची चिंता मागील चार दिवसांमध्ये वाढली आहे. कारण, मागील चार दिवसांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात नऊ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, नव्याने सापडलेले हे कोरोनाचे रुग्ण हे 'मुंबई रिटर्न' आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ही 15 वर पोहोचली आहे. यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला रुग्ण हा गुहागर तालुक्यात आढळून आला होता. दुबईहून आलेल्या या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर मरकज कनेक्शन असलेल्या राजीवडा या भागातील देखील एकाला कोरोनाची लागण झाली होती. यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात एकूण सहा जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामध्ये सहा महिन्यांच्या बाळाचा देखील समावेश होता. तर, खेडमधील एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याला कोरोना झाल्याचे रिपोर्टमधून समोर आले होते. पण, रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये पाच रुग्णांना उपचाराअंती सोडून देण्यात आले होते. पण, आता नऊ नव्या रुग्णांची भर पडली आहे.


'मुंबई रिटर्न' कोरोना रुग्ण आहेत कुठले?
मागील चार दिवसामध्ये जिल्ह्यातील दापोली, मंडणगड, चिपळूण, संगमेश्वर या तालुक्यांमध्ये कोरोनाचे नऊ रुग्ण आढळून आले आहेत. या साऱ्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री ही 'मुंबई रिटर्न' आहे. मुंबईहून आलेल्या या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याने आता चाकरमान्यांना गावी घेण्यावरुन पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली आहे.


Lockdown | प्रेयसीच्या ओढीने मुंबई ते सिंधुदुर्ग पायी प्रवास, परत येताना पोलिसांनी दोघांनाही पकडलं!





चाकरमान्यांना गावी घेण्याची राजकारण्यांची मागणी
कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मुंबई आणि पुणे या ठिकाणी सध्या कोकणातील लाखो नागरिक वास्तव्य करत आहेत. त्यामुळे सारी परिस्थिती पाहता त्यांना आपल्या कोकणातील मूळगावी आणावी अशी मागणी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून केली जात आहे. पण, त्यांना गावी आणल्यानंतर त्यांची आरोग्याच्या दृष्टीने कशी काळजी घेतली जाणार आहे? चाकरमान्यांना गावी घेण्याकरता विरोध नसून त्यांची शिवाय गावातील लोकांच्या आरोग्याची कशी काळजी घेणार? असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.


जिल्हा प्रशासनाचे आवाहन
दरम्यान, मागील चार दिवसात नऊ कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. पण, नागरिकांनी घाबरु नये. मुंबई किंवा इतर ठिकाणाहून जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला क्वॉरन्टाईन करुन ठेवले जात आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. नागरिकांनी आतापर्यंत केले तसेच सहकार्य घाबरुन न जाता करावे असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.