रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात आता बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे आपल्या लोकांना भेटणे देखील दिवसेंदिवस कठीण होत आहे. त्यामध्ये प्रेमवीरांनाचाही समावेश आहे. आपल्या गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंडच्या विरहाने अनेकांना लॉकडाऊन नकोसा वाटत आहे. सोशल मीडियाचा आधार घेत एकमेकांशी टचमध्ये राहणे शक्य असले तरी पुरे झाला लॉकडाऊन अशा शब्दात अनेकजण आपली घुसमट देखील व्यक्त करत आहेत. तिला किंवा त्याला भेटण्यासाठी अनेकजण नामी शक्कल देखील लढवत आहेत. पण, शेकडो किलोमीटरचे अंतर असल्यास किंवा पोलिसांची नजर चुकवत भेटणार तरी कसे? हा देखील प्रश्नच आहे. मात्र प्रेयसीच्या ओढीने मुंबईतल्या एका तरुणाने सिंधुदुर्गातील कसाल हे गाव गाठले. जवळपास 500 ते 600 किमी अंतर त्याने चालत, मिळेल ते वाहन पकडत त्याने पार केले. पण प्रेयसीला घेऊन परत येत असताना त्याला पोलिसांनी पकडले आणि अखेर क्वॉरन्टाईन करुन ठेवले.
तिच्या ओढीने तो कसा पोहोचला कोकणात?
मुंबईत कामाला असलेला प्रियकर हा मूळचा उत्तर प्रदेशचा. तर ती कोकणातील. दोघेही मागील 2 ते 3 वर्षापासून एकमेकांना ओळखतात. तर, मागील एक वर्षापासून दोघेही एकत्र राहतात. प्रियकर मुंबईत स्विगी डिलिव्हरी बॉयचे काम करतो आणि ती आहे नर्स. कोकणात शिमग्याकरता आलेली प्रेयसी लॉकडाऊनच्या काळात गावी अडकून पडली. मुंबईत जाण्यासाठी लाख प्रयत्न झाले पण यश काही आले नाही. अखेर तिला आणण्यासाठी त्याने प्रेयसीचे गाव गाठण्याचा निर्णय घेतला. मिळेल ते वाहन पकडत, पोलिसांची नजर, चौकी-पहारे चुकवत, आडमार्गाने, प्रसंगी चालत तो तिच्या कोकणातील मूळगावी पोहोचला देखील. गावात याची कुणकुण लागू नये म्हणून त्याने गावातील शाळेत वस्ती केली. दुसऱ्या दिवशी त्याने आपल्या प्रेयसीला घेतले आणि मुंबईच्या दिशेने निघाला देखील. पण, यावेळी त्याच्याकरता मुंबई गाठणं कठीण होते. कारण, जोडीला ती असल्याने पोलिसांची नजर चुकवणे, कडक चौकी-पहारे चुकवणे हे काम तसे जोखमीचे होते. पण, सिंधुदुर्गची सीमा पार करण्यास दोघेही यशस्वी झाले.
त्यानंतर दोघेही रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे पोहोचले. भूक लागल्याने दोघांनी शिवभोजन थाळीच्या ठिकाणी जेवण करण्याचे ठरवले. पण, यावेळी तिथल्या काही पोलिसांच्या ध्यानात ही बाब आली. त्यामुळे एखाद्या चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे सुरु झालेल्या या स्टोरीचा क्लायमॅक्स पोलीस लिहिणार हे निश्चित झाले. पोलिसांनी दोघांकडे चौकशी केली आणि संपूर्ण गोष्ट समोर आली. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधत त्यांना परत पाठवण्याबाबत विचारणा करण्यात आली. पण, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी त्यास नकार दिला. दरम्यान, या दोघांना त्यानंतर लांजा येथे क्वॉरन्टाईन करुन ठेवण्यात आले आहे. त्यांचे स्वॅब देखील तपासणीकरता पाठवले आहेत. या दोघांचे रिपोर्ट आल्यानंतर त्यांना सिंधुदुर्गात पाठवले जाणार असल्याची माहिती लांजा पोलीस स्टेशनचे पीआय संजय चौधर यांनी 'एबीपी माझा'ला दिली आहे.
34 जण क्वॉरन्टाईन
ही सर्व गोष्ट समोर आल्यानंतर सिंधुदुर्ग प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सिंधुदुर्गातील ज्या गावी तरुणाने वस्ती केली होती, त्या ठिकाणाच्या 34 जणांना क्वॉरन्टाईन करुन ठेवले आहे. मुंबईमध्ये सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. हा तरुण देखील रेडझोनमधून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून 34 जणांना क्वॉरन्टाईन करुन ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.