मुंबई : उष्णतेच्या झळांनी सध्या मुंबईसह महाराष्ट्र होरपळून निघतो आहे. आज मुंबईत तब्बल 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर कल्याण आणि ठाणे परिसरात तब्बल 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जगातल्या सर्वात उष्ण शहरांच्या यादीत मुंबई आठव्या स्थानी राहिली. गेल्या काही वर्षांच्या उन्हाळ्यातील ही उच्चांकी तापमानाची नोंद आहे.
विदर्भातही तापमान तब्बल 3 ते 6 अंशांनी वधारले आहे. अकोल्याचा पारा तब्बल 40.5 अंश सेल्सिअस राहिला. रायगड जिल्ह्यातल्या भीरामध्ये तब्बल 43.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तिकडं तळकोकणातही काल तब्बल 42 अंश कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
पूर्वेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळं तापमानात ही कमालीची वाढ झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तसंच येत्या 24 तासात मुंबई आणि परिसरात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळं आज दिवसभर मुंबईकरांनी काही महत्त्वाच्या कामाशिवाय बाहेर पडू नये.