Maratha Reservation Mumbai March : मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी समोर येत असून, मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही नोटीस देण्यात आली आहे. तसेच, मराठा आंदोलनामुळे विपरीत परिणाम होवून मुंबईची दैनंदिन वाहतुक व्यवस्था कोलमडणार असल्याचे नोटीसमधून सांगण्यात आले आहेत. सोबतच, आंदोलकांची संख्या लक्षात घेता मुंबईत त्यांना जागा पुरेल एवढे मोठे एकही मैदान नाही, त्यामुळे आंदोलन करण्यासाठी खारघरमधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान संयुक्तिक राहील असे पोलिसांकडून नोटीसमध्ये सांगण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईत आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगे यांना पोलिसांकडून परवानगी मिळणार का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
मुंबईची दैनंदिन वाहतुक व्यवस्था कोलमडणार
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून, मुंबई येथे विविध वित्तीय संस्था,आंतरराष्ट्रीय वकालती व इतर वित्तीय केंद्रे कार्यरत आहेत. मुंबईत अंदाजे दररोज 60 ते 65 लाख नागरिक हे नोकरी निमित्ताने ट्रेन व इतर वाहतूकीच्या माध्यमाने प्रवास करीत असतात. सकल मराठा समाज आंदोलक हे प्रचंड मोठया वाहन संख्येसह मुंबईत आल्यास त्याचा विपरीत परिणाम होवून मुंबईची दैनंदिन वाहतुक व्यवस्था कोलमडणार आहे.
कार्यक्रमास अडथळा होण्याची शक्यता
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आझाद मैदानाचे 7000 स्क्वेअर मीटर एवढेच क्षेत्र आंदोलनासाठी राखीव ठेवण्यात आलेले असून, त्याची क्षमता 5000 ते 6000 आंदोलकांना सामावून घेण्याएवढीच आहे. परंतु तेथे प्रचंड मोठ्या संख्येने आंदोलक आल्यास त्यांना थांबण्यासाठी मैदानात पर्याप्त जागा उपलब्ध होणार नाही. त्याप्रमाणात सोयी सुविधा देखील तेथे नाहीत. तसेच उर्वरित मैदान क्रीडा विभागाच्या अख्यत्यारित असून शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या आदेशानुसार आंदोलनासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच, शिवाजी पार्क येथे एखादे आंदोलन, कार्यक्रम याकरिता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसर बृहन्मुंबई महानगरपालिका परवानगी घेणे आवश्यक आहे. सदर ठिकाणी विना परवानगी आंदोलन, कार्यक्रम केल्यास तो न्यायालयाच्या अवमान होईल. तसेच 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन असल्याने शिवाजी पार्कवर ध्वजारोहण व पथसंचलनाचा शासकीय कार्यक्रम पूर्व नियोजित आहे. आपल्या आंदोलनामुळे सदर कार्यक्रमास अडथळा होण्याची शक्यता आहे. तसेच एवढया प्रचंड मोठया संख्येने येणाऱ्या आंदोलकांना सामावून घेण्याची क्षमता शिवाजी पार्क मैदानाची नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहेत.
मुंबईमधील कोणत्याही मैदानामध्ये आंदोलकांना सामावून घेण्याची क्षमता नाही.
आपण लाखोंच्या संख्येने आंदोलक व वाहनांसह मुंबईत येणार असल्याचे घोषित केले आहे, त्यामुळे मुंबईतील दैनंदिन जनजीवन विस्कळीत होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. तसेच मुंबईची भौगोलिक स्थिती, लोकसंख्या, वाहनांची संख्या, अरुंद रस्ते, उपलब्ध नसलेले पर्यायी रस्ते, खोळंबणारी वैद्यकीय सोयीसुविधा, त्यामुळे होणारी रुग्णांची हेळसांड व इतर अत्यावश्यक सेवांवर होणारा प्रभाव पाहता मुंबईतील एकूण सार्वजनिक सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार आहे. त्याचप्रमाणे आपण वेळोवेळी सांगितल्याप्रमाणे हे आंदोलन प्रचंड संख्येचे असून मुंबईमधील कोणत्याही मैदानामध्ये एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येच्या आंदोलकांना सामावून घेण्याची क्षमता नाही. त्याचप्रमाणे सदरचे आंदोलन हे अनिश्चित कालीन असल्याने त्यासाठी आवश्यक सोयी सुविधा दीर्घकाळासाठी मुंबईमध्ये पुरविणे शक्य होणार नाही व त्याचा परिणाम सार्वजनिक आरोग्य व इतर नागरी सुविधांवर होणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: